'तू मला हात लावलाच कसा' फक्त या वाक्यामुळे दोन तरुणांमध्ये झालेल्या मारहाणीत एकाचा जीव गेला आहे. आता खटमल अर्थात ढेकणाने तरुणाचा जीव घेतला मग दोघांमध्ये झालेल्या मारहाणीतून तरुणाचा मृत्यू कसा? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. खरंतर आरोपीचं नाव कुमाइलराजा सैय्यद उर्फ शाहरुख खटमल असं आहे. तर मृत तरुणाचं नाव अल्ताफ (22) असं आहे. गुन्हे अन्वेषण यूनिट 6 ने फक्त आठ तासात या प्रकणाचा छडा लावत आरोपीला छेडा नगर येथून अटक केली आहे.
शुक्रवारी गोवंडीच्या बैगनवाडीमध्ये रिक्षात बसण्यावरून या दोघांमध्ये वाद झाला. या दोघांमध्ये वाद सुरू असताना अल्ताफने सैय्यद उर्फ शाहरुख खटमलच्या कानाखाली मारली. दरम्यान 'मला हात लावलाच कसा' असं म्हणत खटमलने अल्ताफवर चाकूने वार केला. यामध्ये अल्ताफचा मृत्यू झाला. याप्रकरणाची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला.
गुन्हे अन्वेषण युनिट 6च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर शाहरुख खटमल नवी मुंबईला निघून गेला. दरम्यान पोलिसांचे 6 वेगवेगळे पथक बनवून नवी मुंबई आणि आसपासच्या परिसारत तैनात होत खटमलचा शोध सुरू केला. मात्र कोणतेही सबळ पुरावे हाती लागले नाहीत. शिवाय आरोपीने मोबाईलही बंद केला होता. अखेर पोलिसांच्या हाती एक पुरावा हाती लागला. त्याआधारावर तपास सुरू केला असता खटमल लोकमान्य टिळक टर्मिनसहून मुंबई बाहेर जाण्याच्या तयारीत असल्याची सूचना पोलिसांनी मिळाली.
याच सूचनेच्या आधारावर गुन्हे अन्वेषण विभागतल्या पोलिसांच्या पथकाने खटमलला पकडण्यासाठी सापळा रचला. दरम्यान खटमल छेडानगरमध्ये येताच पोलिसांनी त्याला अटक केली. सध्या या घटनाचा तपास शिवाजीनगर पोलीस करत आहे.