परदेशी नागरिकांना लुटणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीला चेन्नईतून अटक


परदेशी नागरिकांना लुटणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीला चेन्नईतून अटक
SHARES

भारतात पर्यटनासाठी येणाऱ्या परदेशी नागरिकांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डची माहिती चोरून त्यांना लुटणाऱ्या एका टोळीच्या मुख्य आरोपीला पकडण्यात प्राॅपर्टी सेलच्या आधिकाऱ्यांना यश आलं आहे. आर. मनोजकुमार असं या आरोपीचं नाव आहे. गुन्हा उघडकीस आल्यानंतर अटकेच्या भीतीनं मलेशियाला पळून गेलेला मनोजकुमार चेन्नईत परतल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.


यांनाही अटक

पोलिसांनी यापूर्वी या गुन्ह्यात जुबेर सय्यद (३०), हसन शेख (४०), फईम शेख (३०), अबू बोकर (४५), मुकेश शर्मा (४५) या आरोपींना अटक केली होती. या टोळीकडून पोलिसांनी ५१ स्वाईप मशीन, दोन लॅपटाॅप, ६५ बनावट डेबिट आणि क्रेडिट कार्ड, कार्ड बनवण्यासाठी लागणारं कार्डरिडर आणि शेकडो चेकबुक हस्तगत केली आहेत. फसवणूक करण्यात आलेल्या परदेशी नागरिकांमध्ये अमेरिका आणि चीनच्या नागरिकांची संख्या सर्वाधिक होती.


परदेशात पलायन

पोलिसांचा ससेमिरा मागे लागल्यानंतर मुख्य आरोपी मनोजकुमार परदेशात पळून गेला होता. दरम्यान, मलेशियातून मनोजकुमार चेन्नई विमानतळावर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या प्राॅपर्टी सेलनं चेन्नई पोलिसांना मनोजबाबत माहिती दिली होती. त्यानुसार गुरूवारी सकाळी मनोजकुमारला विमानतळावर उतरल्यानंतर चेन्नई पोलिसांनी ताब्यात घेतलं. मनोजकुमारचा ताबा मिळवण्याासाठी मुंबई पोलिसांचं विशेष पथक चेन्नईला रवाना झालं आहे. मनोजच्या अटकेने अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता अाहे.


कधीपासून सुरू आहे हा प्रकार?

मालाडच्या मालवणीत परिसरात राहणारा एक दुकानदार कार्डक्लोन करून नागरिकांच्या पैशांवर डल्ला मारत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या प्राॅपर्टीचे पोलिस निरीक्षक रहिमतुल्ला सय्यद यांना मिळाली. त्यानुसार पोलिस अधिकारी संतोष गायकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे, दीप बने अाणि अन्य कर्मचाऱ्यांनी मालवणीतील कपड्याचे व्यापारी हसन शेखला संशयित म्हणून ताब्यात घेतले. हसन शेखच्या चौकशीतून पोलीस या टोळीचा माग काढत होते. २०१३ पासून ही टोळी परदेशी नागरिकांना गंडवत आहे.


कोट्यवधींना गंडा

या टोळीनं आतापर्यंत गोवा, बंगळूर, जयपूर, हिमाचल प्रदेश, लुधियाना, चंडीगढ, कुलू मनाली येथे अनेकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातला आहे. विशेष म्हणजे, या गुन्ह्यात अद्याप एकही तक्रारदार पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यासाठी पुढे आलेला नाही. त्यामुळे पोलिसांनीच मालवणी पोलिस ठाण्यात अटक आरोपींविरोधात ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४१, २०(ब) भादविसह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(क), ६६(ड) नुसार गुन्हा नोंदवला अाहे.


कसा चोरला जातो डाटा?

मुंबईतील नागरिकांचे कार्ड क्लोन करून त्यांना लुबाडल्यास पोलिस अापल्याला पकडतील, या भीतीने त्यांनी परदेशी नागरिकांना टार्गेट केले. देशातील पर्यटन विभागांना भेट देणारे परदेशी नागरिक खरेदीसाठी ज्या दुकानात जातात, त्या ठिकाणी ते त्यांचे पैसे देण्यासाठी कार्डचा वापर करतात. त्यामुळे दुकानदारांना हाताशी धरून त्यांना या चोरीत २० टक्के कमिशन दिले जायचे. त्यानंतर दुकानदारांचे स्वाइप मशिन रात्रीच्या वेळीस घरी आणून परदेशी नागरिकांच्या कार्डमधून चोरलेल्या माहितीचे बनावट कार्ड बनवून पैसे काढायची. विशेष म्हणजे, समोरील तक्रारदाराला जरी संशय आला. तरी पैसे खात्यावर जमा होईपर्यंत त्याला काही करता येऊ नये. त्या अनुषंगाने ठराविक वेळेतच हे कार्ड स्वाइप करून पैसे काढायचे. परदेशात बँका बंद झाल्यानंतर ही टोळी भारतातून त्यांच्या खात्यातून पैसे काढायची.


हेही वाचा -

बँकेतील महिलाच सायबर चोरट्यांच्या जाळ्यात, १ लाखाला गंडवलं

धक्कादायक! मुंबईत मुलींच्या अपहरणात वाढ



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा