अपहरण करणारा पोलिसांच्या अटकेत


अपहरण करणारा पोलिसांच्या अटकेत
SHARES

मुंबई गुन्हे शाखेने दिंडोशी येथील दोघा व्यावसायिकांचे अपहरण करणाऱ्या महेंद्र मोरे (40) नावाच्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. विशेष म्हणजे या मोरेविरोधात गुजरातच्या महेसाणा येथे देखील एक कोटी रुपयांच्या चोरीच्या आरोपाचा गुन्हा दाखल आहे. फेब्रुवारी महिन्यात दिंडोशी येथील दोघा तरुणांचे अपहरण करण्यात आले होते. हे दोघेही एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याचे काम करत असत.

मिळालेल्या माहितीनुसार संतोष सहानी नावाच्या एका व्यक्तीकडून या दोघांनी 12 लाख रुपये घेतले होते. पण ते वेळीच परत न दिल्याने संतोष आणि त्याच्या साथीदारांनी या दोघांचे अपहरण केले होते.

आधी त्यांना भूलथापा दिल्या आणि लोणावल्याला घेऊन गेले. त्यानंतर तिथे त्यांना दोन दिवस डांबून ठेवत या दोघांकडे असलेले पैसे काढून घेतले आणि त्यांना मारहाण केली. पैसे परत देण्याच्या नावाखाली आरोपींनी या दोघांना मुंबईला आणले. हे सगळे गोरेगावच्या रत्नागिरी होटेलात बसले असताना दोन्ही पीडितांनी आरडा-ओरडा केला आणि त्यानंतर या दोघांची सुटका झाली.

या प्रकरणातला महेंद्र मोरे नावाचा आरोपी बुधवारी मेघवाडी येथे येत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचत आरोपी महेंद्र मोरेला अटक केली. सध्या त्याला पुढील तपासासाठी दिंडोशी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा