नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक

चौघांनी रेल्वेत ओळखीवर पैसे भरून तिकिट तपासणीसपदी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार लांडगे यांनी त्याच्यासह त्यांच्या १८ मित्रांचे मिळून ७० लाख रुपये आरटीजीएसटीद्वारे या चौघांकडे जमा केले.

नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक
SHARES

रेल्वेत नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून मुंबईसह राज्यातील तरुण-तरुणींना ७० लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा ११ च्या पोलिसांनी अटक केली आहे. राजेशकुमार, मनिष सिंग, सिमा पवार  अशी आरोपींची नावे आहेत. या तिघांना न्यायालयाने ३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील अन्य आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.


१८ जणांची फसवणूक

ऐरोली परिसरात राहणारे तक्रारदार सखाराम लांडगे यांनी रेल्वे भरतीत फाॅर्म भरला होता. यावेळी त्यांची ओळख राजेशकुमार, मनिष सिंग, संजीव राय आणि सिमा पवार यांच्याशी झाली. चौघांनी रेल्वेत ओळखीवर पैसे भरून तिकिट तपासणीसपदी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार लांडगे यांनी त्याच्यासह त्यांच्या १८ मित्रांचे मिळून ७० लाख रुपये आरटीजीएसटीद्वारे या चौघांकडे जमा केले.


बोगस कागदपत्रे

या चौकडीने पैसे घेतल्यानंतर १८ जणांना काही दिवसातच रेल्वेचे अपाॅइंटमेंट लेटर, पोस्टिंग लेटर, पेमेंट स्लिप, आणि ओळखपत्रही पोस्टाने पाठवले. एवढेच नव्हे तर त्या १८ जणांना विश्वास पटावा, त्यासाठी आरोपींनी इंटरनेटवर रेल्वेची बनावट बेवसाईटही बनवून त्यावर या १८ जणांचे सिलेक्शन झाल्याची यादी जाहीर केली.  मात्र यातील एका तरुणाने रेल्वेच्या सीएसटी येथील कार्यालयात काही त्रुटीबाबत संपर्क साधला असता रेल्वेने अशा प्रकारे कुठलीही नियुक्तीची यादी जाहीर केली नसल्याचे सांगितले. त्यानंतर चौकशीत या चौघांनी फसवणूक केल्याचे कळाल्यानंतर सखाराम लांडगे यांनी गोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.


वाराणसीतून अटक

तपासात या चौघांनी मुंबई आणि महाराष्ट्रातच नव्हे, तर उत्तरप्रदेश, कोलकत्ता येथीलही अनेक मुलांना अशा प्रकारे फसवल्याचे निष्पन्न झाले. हा गुन्हा अधिक तपासासाठी गुन्हे शाखा ११ च्या पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. त्यानुसार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चिमाजी आढाव, पोलिस निरीक्षक आनंद रावराणे, रईस शेख, सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद झिने, नितीन उतेकर यांच्या पथकाने राजेश कुमार आणि मनिष सिंग यांना वाराणसीतून तर सिमाला अंधेरीतून अटक केली आहे. संजीव राय फरार आहे. 



हेही वाचा  -

रॅगिंगला कंटाळून डॉक्टर तरुणीची आत्महत्या




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा