बायकरमुळे झाला अपघात, पोलिस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू


बायकरमुळे झाला अपघात, पोलिस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
SHARES

नाकाबंदीदरम्यान गाडीची कागदपत्र नसलेल्या आरोपीसोबत पोलिस ठाण्याच्या दिशेने जात असताना आरोपीने वेडीवाकडी गाडी चालवल्यामुळे झालेल्या अपघातात गावदेवी पोलिस ठाण्याचे हवालदार सुनील कदम गंभीर जखमी झाले होते. ८ दिवस बेशुद्ध अवस्थेत असलेल्या कदम यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी कदम यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गावदेवी पोलिसांनी गुरुवार, १७ मे रोजी दुचाकी चालकाला अटक केली असून, त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


ट्रिपल सीटमुळे अडवलं...

गावदेवी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले हवालदार सुनील कदम हे ११ मे रोजी पहाटे कॅडबरी जंक्शन येथे नाकाबंदीवर होते. त्यावेळी ट्रिपल सीट आलेल्या एका दुचाकीस्वाराला पोलिसांनी अडवले. दुचाकी चालक सिराजुद्दीन अब्दुल गफार शेख (२६) याची चौकशी केली असता त्याच्याकडे वाहन परवाना वा दुचाकीचे कागपत्र नव्हते. तसेच दुचाकीच्या नंबर प्लेटवरही खाडाखोड केली होती. एकूण सर्व परिस्थिती पाहता दंड वसूल करण्यासाठी हवालदार सुनील कदम हे शेख याच्या दुचाकीवरून गावदेव पोलीस ठाण्यात जाण्यासाठी निघाले.


शेखमुळे झाला गंभीर अपघात

दरम्यान, काही अंतरावर असलेला सिग्नलजवळ शेख याने यू टर्न घेऊन दुचाकी सुसाट पळवली. दुचाकीवरील कंट्रोल सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ३ वाहनांवर दुचाकी धडकून फुटपाथवर चढून खांबाला धडकली. यात हवालदार सुनील कदम व शेख गंभीर जखमी झाले. सदर घटना पाहणाऱ्या एका नागरिकाने ताडदेव पोलिस ठाण्याच्या चौकीत अपघाताची माहिती दिली. ताडदेव पोलिस ठाण्याची मोबाईल व्हॅन क्रमांक १ तात्काळ घटनास्थळी पोहोचली. त्या दोघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.


आरोपीला अटक

या प्रकरणी गुरुवारी आरोपी सिराजुद्दीन अब्दुल गफार शेख याला नायर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर गावदेवी पोलिसांनी त्याच्यावर भादंवि कलम ३०८, ३६५, ३५३, ३३३, ३३६, ३३८ आणि २७९ नुसार गुन्हा नोंदवत त्याला अटक केली.



हेही वाचा

१० वर्षे गैरहजेरी, तरीही फूल पगारी!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा