चीटर बंधू गजाआड


चीटर बंधू गजाआड
SHARES

कित्येक व्यापाऱ्यांची फसवणूक केल्या प्रकरणी दोघा भावांना मुंबईच्या खार पोलिसांनी अटक केली आहे. हसनअली भोपानी आणि होजेफा भोपानी अशी या दोघांची नावे आहेत. या आरोपींनी खार आणि वांद्रे परिसरातील 20 व्यापाऱ्यांना तब्बल 1 कोटी 28 लाखला फसवले आहे. या प्रकरणी हसनअलीची पत्नी जैनब हिला देखील आरोपी करण्यात आले आहे.

हसनअली आणि होजेफा यांचे खारच्या 16व्या रस्त्यावर एक्स्पर्ट कम्युनिकेशन नावाचे मोबाइलचे दुकान असून त्यातच यांनी आपला फसवणुकीचा धंदा उघडला होता.

हे दोघे आसपासच्या व्यापारी वर्गाला मोठमोठ्या स्किममध्ये पैसे गुंतवण्यास सांगत, तसेच मल्टिनॅशनल कंपनी असलेल्या अॅपलची उपकरणं आणि सेट टॉप बॉक बसवण्याचा कंत्राट आपल्याला मिळाल्याचा दावा ते करत. त्यात पैसे गुंतवल्यास 40 टक्के परताव्याची गुंतवणूकदारांना स्वप्न दाखवत. व्यापाऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी ते खोट्या ऑर्डरची प्रत देखील दाखवत.

"सुरुवातीला जेव्हा छोट्या गुंतवणुका केल्या तेव्हा काही काळ या दोघांनी परतावा दिला, पण नंतर ते मोठ्या रकमेची मागणी करू लागले, तब्बल 40 लाख रुपये या दोघांकडे गुंतवले होते. पण त्या नंतर मात्र दोघांचा सूर बदलला, पैसे देण्यासाठी ते वेळ मागू लागले, टाळाटाळ करू लागले. असे करत करत त्यांनी तीन वर्षे काढली शेवटी यांची पोलिसांत तक्रार करण्यावाचून पर्याय नसल्याची" माहिती तक्रारदार रोहित सोनी यांनी दिली.

तर दोघांनाही अटक केली असून गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र जाधव यांनी दिली.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा