सोनसाखळी चोर पोलिसांच्या जाळ्यात

  Mumbai
  सोनसाखळी चोर पोलिसांच्या जाळ्यात
  मुंबई  -  

  कॉटनग्रीन रेल्वे स्थानकावरील प्रवाशाच्या गळ्यातील सोनसाखळी आणि खिशातील मोबाइल काढून पळ काढणाऱ्या दोन सोनसाखळी चोरांना पकडण्यात वडाळा लोहमार्ग पोलिसांना मंगळवारी यश आले. शाहरुख ताहीर खान (20) आणि नूर इस्लाम जहाँगीर शेख उर्फ बाटला (17) अशी दोघांची नावे आहेत.

  उरण कारंजा येथील चुनाभट्टी कॉलनीत राहणारे दर्शन दयाराम जाधव हार्बर मार्गावरील कॉटनग्रीन स्थानकातील फलाट क्रमांक 2 वर सोमवारी पहाटे 4.30 वा. लोकलची वाट पाहत होते. लोकलची वाट पाहून थकलेले जाधव तेथील बाकावरच झोपी गेले. ते गाढ झोपेत असल्याचा फायदा घेत दोन अज्ञात चोरांनी त्यांच्या गळ्यातील 30 व 45 हजार रुपये किमतीच्या दोन सोनसाखळ्या व पँटच्या खिशातील13 हजार रुपये किमतीचा मोबाइल फोन चोरुन पळ काढला.

  याप्रकरणी जाधव यांनी वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असता सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने पोलिसांनी चोरांचा शोध सुरु केला. तसेच तपासासाठी विशेष पथकही नेमले होते. पोलीस हवालदार सुधीर चौधरी, पोलीस नाईक गुरु जाधव, पोलीस कॉस्टेबल अमित बनकर यांचा तपास सुरू असताना त्यांना खबऱ्यांकडून या दोन आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी मंगळवारी सकाळी सापळा रचून माहीम रेल्वे स्थानकातून दोघांना अटक केली.

  त्यांची चौकशी केली असता दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय. बी. सरोदे यांनी दिली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.