नोकरीच्या आमिषाने बेरोजगारांना लाखोंचा गंडा, दोघांना अटक

नोकरीसाठी आखाती देशात मशीद बंदर येथील एका कार्यालयातून तरुणांना पाठवलं जात असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाला मिळाली होती. यानुसार पोलिसांनी मशीद बंदर रेल्वे स्थानकासमोरील पटवा चेंबर्स येथे छापा टाकला.

नोकरीच्या आमिषाने बेरोजगारांना लाखोंचा गंडा, दोघांना अटक
SHARES

 बेरोजगार तरूणांना नोकरीचं आमिष दाखवून त्यांची लाखो रुपयांना फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. या टोळीतील दोघांना अटक करण्यात आली आहे. परदेशात नोकरी लावण्याचं आमिष या टोळीने अनेक तरूणांना दाखवलं होतं. त्यांच्याकडून या टोळीने लाखो रुपये उकळले आहेत. 

नोकरीसाठी आखाती देशात मशीद बंदर येथील एका कार्यालयातून तरुणांना पाठवलं जात असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाला मिळाली होती. यानुसार पोलिसांनी मशीद बंदर रेल्वे स्थानकासमोरील पटवा चेंबर्स येथे छापा टाकला. यावेळी अक्रम शरीफ शेख आणि मोहम्मद शाबीर अकबर या दोघांना अटक करण्यात आली. या कार्यालयातून संगणक, प्रिंटर, ७९ पासपोर्ट, ३० व्यक्तींचे कुवेत या देशाचे व्हिसाचे फोटोप्रिंट, चार रबरी शिक्के तसंच इतर साहित्य हस्तगत करण्यात आलं आहे. आरोपींना न्यायालयाने १८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

आरोपी नोकरी मिळवून देतो असं सांगत तरूणांकडून ७० ते ७५ हजार रुपये उकळत होते. तरुणांच्या पासपोर्टवर बनावट व्हिसा तयार केला जात असे.  हा बनावट व्हिसा पासपोर्टवर चिटकवून त्यावर कुवेत वकालतीचा बनावट स्टॅम्प मारण्यात येत होता. आरोपींच्या चौकशीमध्ये महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, बिहार, पंजाब, गुजरात, ओरिसा या राज्यातील तरूणांची या टोळीने फसवणूक केली असल्याचं समोर आलं आहे. 



हेही वाचा -

अयोध्याच्या निकालावरून माथी भडकवण्याचा प्रयत्न, १४१ पाकिस्तानी ट्विटर हँडल ब्लाॅक




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा