SHARE

गोवंडी - पाइपलाइनच्या कामासाठी पालिकेच्या वतीने खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून दोघा तरुणांचा मृत्यू झालाय. मोहम्मद इमरान मुस्तफा खान (28) आणि मोहम्मद इकरार निजामुद्दीन कुरेशी (26) अशी मृतकांची नावं आहेत. घाटकोपर-मानखुर्द लिंकरोड इथे असलेल्या देवनार डम्पिंग ग्राऊंड सिग्नल जवळ ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे सहाच्या सुमारास मोहम्मद इकरार गाडी धुण्यासाठी त्या खड्ड्यातून पाणी काढत होता. मात्र तोल जाऊन तो त्या 10 फूट खोल खड्ड्यात पडला. त्याचवेळी इमरानने त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र तोही त्या खड्ड्यात पडला आणि त्या दोघांचाही मृत्यू झाला.

या संदर्भात माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाला सूचित केले. दरम्यान घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतांना बाहेर काढलं. तर पोलिसांनी दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या स्थानिकांनी हायवेवर चक्का जाम केला. मात्र घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी जमावाला पांगवत स्थिती नियंत्रणात आणली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या