झेड प्लसची सुरक्षा असतानाही उज्ज्वल निकमांचे दोन्ही मोबाईल लंपास

  Mumbai
  झेड प्लसची सुरक्षा असतानाही उज्ज्वल निकमांचे दोन्ही मोबाईल लंपास
  मुंबई  -  

  रस्त्यावरून अथवा प्रवासादरम्यान मोबाईल चोरी झाल्याच्या घटना घडतच असतात. पण एक नामांकित व्यक्ती, ज्याला झेड प्लसची सुरक्षा लाभलेली असताना त्याचा मोबाईल चोरीला जातो. हे वाचून जरा नवलच वाटले असेल ना? पण हे खरे आहे. नामांकित सरकारी वकील उज्ज्वल निकम हे तर आपण सर्वांनाच माहीत आहेत. ते प्रवास करत असताना त्यांच्या दोन्ही मोबाईल फोनची चोरी झाली. विशेष म्हणजे उज्ज्वल निकमांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा आहे. असे असतानाही चोराने मात्र सुरक्षा रक्षकांची नजर चुकवत निकमांच्या मोबाईलवर डल्ला मारला.

  शुक्रवारी मुंबईतील सर्व खटले संपवून दादर-अमृतसर पठाणकोट एक्स्प्रेसने उज्ज्वल निकम जळगावसाठी रवाना झाले. A1 थ्री-टायर एसी कोचने प्रवास करणारे निकम कल्याणपर्यंत जागे होते. त्यानंतर मात्र त्यांना झोप लागली. सकाळी पाच वाजता पोचरा या ठिकाणी त्यांना जाग आली. तेव्हा त्यांनी त्यांच्या उशीखाली ठेवलेले मोबाईल तपासत असताना त्यांचे दोन्ही फोन गायब असल्याचे त्यांना दिसले. त्यावेळी त्यांनी आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी कंपार्टमेंटमध्ये फोन शोधले पण मोबाईल फोन काही सापडले नाही. दोन्ही फोन बंद असल्याचे त्यांना आढळले.

  26/11 मुंबई हल्ला, 1993 साखळी स्फोट, शक्ती मिल गँग रेप यांसारखी महत्त्वाची प्रकरणे हाताळल्याने निकम यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. मुंबईत त्यांना सुरक्षारक्षकांस बुलेट प्रूफ गाडी देण्यात येते तर, रेल्वेने प्रवासादरम्यान त्यांच्या वैयक्तिक सुरक्षारक्षकांसह रेल्वेतर्फे चार कॉन्स्टेबल त्यांच्या सुरक्षेसाठी देण्यात येते. प्रत्येकी दोघे हे डब्याच्या एंट्री आणि एक्झिट गेटवर पहारा देत असतात. इतकी सुरक्षा असताना देखील चोरी झालीच कसी?, तो चोर कोण आहे? याचा तपास सध्या जळगाव रेल्वे पोलीस करत आहेत. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.