टॅक्सी चालकांना लुटणारे तिघेजण गजाआड

 Vikhroli
टॅक्सी चालकांना लुटणारे तिघेजण गजाआड
Vikhroli, Mumbai  -  

टॅक्सी चालकांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या तीन लुटारूंना विक्रोळी पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. मेहता शराफत अली खान (30), ऋषभ चौटालिया (30) आणि राहुल तिवारी (23) अशी या आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील ग्रॅण्टरोड येथून टॅक्सी पकडून किंवा ग्रॅण्टरोडला जायचे आहे असे सांगून हे तिघेजण टॅक्सी पकडत असत. त्यानंतर टॅक्सी चालकांना पूर्व द्रुतगती मार्गावर नेत. तेथे चाकूच्या धाकाने टॅक्सी चालकाला लुटून त्याची टॅक्सी घेऊन पळ काढत असत. अशा घटना एकाच आठवड्यात सीबीडी बेलापूर, मानखुर्द आणि विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्गावर घडल्या होत्या. यामुळे मुंबईसह नवी मुंबईतील टॅक्सी चालकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु विक्रोळी पोलिसांनी या आरोपींच्या मुसक्या आवळल्याने टॅक्सी चालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

विक्रोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पूर्व द्रुतगती मार्गावर 29 एप्रिल आणि नंतर 5 मे रोजी टॅक्सी चालकांना एकाच पद्धतीने लुटल्याच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. अशाच आणखी काही घटना पंतनगरात घडल्याने विक्रोळी पोलिसांनी या आरोपींचा कसून शोध सुरु केला. त्यानंतर खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून तीन जणांना अटक केली असून आणखी एका अल्पवयीन आरोपीचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी आरोपींकडून दोन टॅक्सी आणि एक चाकूही हस्तगत केला आहे. यातील मुख्य आरोपी मेहता शराफत अली खान हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात 12 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात त्यांचा आणखी साथीदार असल्याचा पोलिसांना संशय असल्याची माहिती विक्रोळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक आयुक्त जे. डी. मोरे यांनी दिली आहे.

Loading Comments