पोलीस अभिलेखावरील सराईत गुंड जेरबंद

 wadala
पोलीस अभिलेखावरील सराईत गुंड जेरबंद

वडाळा - वडाळा पूर्व परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला 10 हजार रूपयाच्या खंडणीसाठी तसंच मोहम्मद इस्माईल भूनकाने इद्रिस (35) यांना मारहाण केल्याप्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. जावेद उर्फ जावा मेहमूद शेख (24) असं या आरोपीचं नाव असून तो पोलीस अभिलेखावरील सराईत गुंड असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

वडाळ्यातील संगमनगरच्या आझाद मोहल्ल्यात घरासमोरील गटार दुरुस्तीचे काम सुरु असताना जावेद तिथे पोहचला. त्याने कोयत्याचा धाक दाखवून मोहम्मद इस्माईलकडे 10 हजार रुपयांची खंडणी मागितली. तेव्हा मोहम्मद इस्माईलने खंडणी देण्यास साफ नकार दिला. ते पाहून संतापलेल्या जावेद उर्फ जावाने लोखंडी सळईने मोहम्मद इस्माईलला जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. लगेचच घटनास्थळी रहिवासी जमले. दरम्यान मोहम्मद इस्माईलला त्याने जीवे मारण्याची धमकी देऊन पोबारा केला. त्यानंतर मोहम्मद इस्माईलने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सुनीता शेळके यांनी तपास सुरू केला. त्यानुसार गुरुवारी पहाटे त्याच्या घराशेजारी सापळा रचून मोठ्या शिताफीने त्याला अटक केली. जावेद उर्फ जावा मेहमूद शेख हा पोलीस अभिलेखावरील मोठा गुंड असून त्याच्या नावावर खंडणी, चोरी तसेच मारामारीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यानुसार त्याला जेरबंद करण्यात आले.

Loading Comments