अखेर खुनी पोलिसांच्या जाळ्यात

  Kurla
  अखेर खुनी पोलिसांच्या जाळ्यात
  मुंबई  -  

  धारावीतल्या गौसिया मस्जिद जवळ गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या एका हत्येप्रकरणी शाहुनगर पोलिसांना हवा असलेला मुख्य फरार आरोपी पकडण्यात पोलिसांना शनिवारी यश आले. अन्सार मुस्तफा सय्यद अली उर्फ जानी बाबू (40) असं आरोपीचं नाव असून त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. चौकशी केल्यानंतर त्याच्यावर रविवारी गुन्हा नोंदविण्यात आला असून, सोमवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

  गौसिया मस्जिद परिसरात राहणाऱ्या कालिया रफिक शेख नावाच्या इसमाने 19 मार्च 2017 रोजी आरोपीच्या नवीन चारचाकी वाहनावर लोखंडीपट्टीने खरडले होते. गाडीची नासधूस पाहून संतप्त झालेल्या संपूर्ण अली कुटुंबाने कालियाला लाथाबुक्क्याने जबर मारहाण केली होती. या जबर मारहाणीत बेशुद्ध अवस्थेत कालियाला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र दोन दिवसानंतर त्याचा त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शाहूनगर पोलिसांनी फरार आरोपी अन्सार मुस्तफा सय्यद अली याची पत्नी खतिजा अली (36), सैय्यद मोहमद अरिफ मुताफ़ा (20), सैय्यद सैफ अली मुस्तफा (21) या दोन मुलांना घटनास्थळी अटक करून त्यांच्यावर कारवाई केली होती. 

  तेव्हापासून अन्सार मुस्तफा सय्यद अली फरार होता. शनिवारी फरार आरोपी बनारसहून निघालेल्या गाडीतून कुर्ल्याच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर उतरणार असल्याची माहिती शाहूनगर पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे शाहूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप थोरात यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक दिलीप गुजर आणि पथकाने लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात सापळा लावून या फरार आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून, त्याच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.