सोशल मीडियावर प्रोफाईल पिक्चर अपलोड करताय? जरा सांभाळून !

  Mulund West
  सोशल मीडियावर प्रोफाईल पिक्चर अपलोड करताय? जरा सांभाळून !
  मुंबई  -  

  तुम्ही जर सोशल नेटवर्किंग साईटवर आपला प्रोफाइल फोटो अपलोड केला असेल तर त्याचा दुरुपयोग तर होत नाही ना याकडे लक्ष द्या. कारण व्हॉटस् अॅपवर डीपी ठेवणे एका तरुणीला महागात पडले आहे.

  मुंबईमध्ये राहणाऱ्या एका तरुणीला व्हॉटस् अॅपवर फोटो अपलोड करणे चांगलेच महागात पडले आहे. या तरुणीने आपला फोटो व्हॉट्स अॅप प्रोफाइल पिक्चर म्हणून ठेवला होता. पण हा फोटो कुणीतरी पडोसन का अड्डा या फेसबुक पेजवर तिच्या मोबाईल नंबरसह अपलोड केला. इतकेच नव्हे तर वेगळ्या नावाने तिचा फेसबुक अकाऊंट देखील उघडले. त्यामुळे गेले दोन महिने या तरुणीला तिच्या मोबाईलवर अश्लील मेसेजेस आणि जग जगभरातून अश्लील फोन कॉल्स येत आहेत.

  गेल्या दोन महिन्यात या तरुणीने हजारो फोन नंबर ब्लॉक केले आहेत. याची तक्रार तिने मुलुंड पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. परंतु दोन महिने उलटून देखील पोलीस आरोपीपर्यंत पोहचू शकले नाहीत. याऊलट खासगी सायबर कन्सल्टंटची मदत घेण्याचा सल्ला दिल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे.

  मुलुंड पोलिसांनी आयटी अॅक्ट अंतर्गत हा गुन्हा नोंदवला असला तरी खासगी सायबर कन्सल्टंट नेमण्याचा सल्ला दिला नसल्याचे पोलीस सांगतात. आरोपी लवकरच पकडला जाईल असे पोलीस जरी सांगत असले तरी गेल्या तीन महिन्यांपासून पोलिसांच्या हाती कोणताच सुगावा लागलेला नाही. त्यात या तरुणीला अद्यापही फोन कॉल्स आणि अश्लील मेसेज केले जात आहेत. त्यामुळे सोशल नेटवर्किंगच्या पड्द्याआड लपलेल्या आरोपीपर्यंत कायद्याचे हात कधी पोहचतील असा प्रश्न उपस्थित होत आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.