पत्नीची हत्या करून आत्महत्येचा बनाव करणारा पती अटकेत

सुमनचा मृत्यू झाल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिस कारवाईला घाबरून संजयने सुमनच्या दोन्ही हाताच्या नसा कापून सुमनने आत्महत्या केल्याचा बनाव रचला.

SHARE

दारू पिऊ न दिल्याने रागाच्या भरात पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना वडाळा येथे घडली. त्यानंतर पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव पतीने रचला. मात्र, पोलिसांसमोर त्याचा हा बनाव टिकला नाही.  अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.  सुमन पडीहारी असं मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी संजय पडीहारी याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.


लाथा-बुक्यांनी मारहाण 

वडाळाच्या प्रतिक्षा नगर परिसरात संजय हा पत्नीसोबत राहत होता. संजय दारूच्या आहारी गेल्यामुळे त्याचे सुमनसोबत वारंवार भांडणं व्हायची. यातून अनेकदा संजयने सुमनला अमानुष मारहाण केली होती. अशातच सुमन पाच महिन्यांची गरोदर होती. १९ मे रोजी याच कारणांवरून दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले. त्यावेळी राग अनावर झालेल्या संजयने गरोदर असलेल्या सुमनला मारहाण केली. या मारहाणीत सुमन जागीच बेशुद्ध पडली. मात्र, तरीही संजय तिला लाथा-बुक्यांनी मारहाण करतच राहिला. या मारहाणीत सुमनचा मृत्यू झाला.


हाताच्या नसा कापल्या

सुमनचा मृत्यू झाल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिस कारवाईला घाबरून संजयने सुमनच्या दोन्ही हाताच्या नसा कापून सुमनने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वडाळा टीटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी सुरूवातीला अपमृत्यूची नोंद केली. संजयकडे या प्रकरणी चौकशी करण्यास सुरूवात केली असता संजयच्या बोलण्यात तफावत आढळून आली. तसंच शवविच्छेदनातही  हत्येनंतर तिच्या हाताच्या नसा कापल्याचे उघडकीस आलं. त्यानंतर पोलिसांनी संजयकडे अधिक चौकशी केली. त्यावेळी संजयने गुन्ह्याची कबुली दिली.हेही वाचा -

अंधेरीत चुलत भावाची गोळ्या झाडून हत्या

नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक
संबंधित विषय
ताज्या बातम्या