मम्मीच्या अडचणीत वाढ, दुसऱ्यांदा गुन्हा दाखल


मम्मीच्या अडचणीत वाढ, दुसऱ्यांदा गुन्हा दाखल
SHARES

कुख्यात गुंड अरूण गवळीची पत्नी आशा गवळी उर्फ मम्मी हिच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुण्यातल्या आणखी एका व्यावसायिकाने पुढे येत आशा गवळीसह, मोबीन मुजावर, सुरज यादव, ओंकार पंचरास, गोरख पोखरकर यांच्यासह अन्य ४ ते ५ जणांवर गुन्हा नोंदवला आहे.


काय म्हटलंय तक्रारीत?

आशा गवळीच्या नावाने धमकावत मोबीनने भायखळाच्या दगडी चाळीत बोलावून वेळोवेळी खंडणीची मागणी केली. इतकेच नाही महिन्याला तर ५ लाख रुपयांची खंडणी न दिल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकीच दिल्याचं व्यावसायिकानं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.


कोण आहे तक्रारदार?

पीडित व्यावसायिक सावळाराम नाईक हे पुण्याच्या लोणी धामणी येथे आपल्या कुटुंबियांसोबत राहतात. नाईक यांची पुण्यात ३६ एकर जमीन असून त्याच भागात त्यांचा पेट्रोल पंप आणि वाईन्सचा शॉप आहे. नाईक हे किडणीच्या आजाराने त्रस्त असल्याने त्यांच्या पश्चात हे सर्व व्यवसाय त्यांचा भाऊ अनिल संभाळतात.


खंडणीसाठी दिली धमकी

मोबीनने त्याचे साथीदार मुजावर, सुरज यादव, ओंकार पंचरास, गोरख पोखरकर यांच्यासोबत मिळून अनिल यांना ५ लाखांची खंडणी आशा गवळी यांच्या नावाने मागितली. यासह हे आरोपी वारंवार फोन करून अनिल यांना पैशासाठी धमकावत होते. मात्र अनिल यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं.


दुकानाची तोडफोड

५ फेब्रुवारी २०१८ रोजी या आरोपींसह त्यांच्या साथीदारांनी येऊन वाईन शॉपची तोडफोड केली. याबाबत स्थानिक गावातील सरपंच आणि पोलिस पाटलाकडे मदत मागितली असता त्यांनी पोलिसात जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार पोलिसात तक्रार करायला जाणार, तोच मोबीनने अनिल यांना जिवे मारणेयाची धमकी दिली. त्यावेळी नाईक यांनी कुटुंबियांच्या सुरक्षेचा आणि या भाणगडीतून एकदाचं बाजूला होण्यासाठी पैसे देण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार मोबीनने नाईक यांना मुंबईत भायळाच्या दगडी चाळीत आशा गवळी यांना भेटण्यासाठी बोलावलं. 


२२ एप्रिल रोजी गुन्हा नोंदवला

२४ फेब्रुवारी रोजी नाईक दगडी चाळीत आले असता मोबीनने त्यांची भेट आशा गवळी यांच्याशी न करून देता आशा गवळीच्या नावाने ५ लाखाची खंडणी मागू लागला. त्यावेळी नाईक यांनी आशा गवळी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली असता मोबीनने धमकावत साडे तीन लाख रुपये काढून घेतले. तर उर्वरित रक्कम नंतर देण्यास सांगितली. त्यानंतर गावच्या जत्रेत मोबीन आणि सूर यांनी पैशांची मागणी केली. त्यावेळी घाबरून नाईक यांनी ५० हजार दिले. दिवसेंदिवस या टोळीकडून पैशांची मागणी सुरूच होती. या टोळीची परिसरात खूपच दहशत पसरसी होती. अशातच मंचर पोलिसात व्यावसायिक सुनिल कोचरने तक्रार दिल्याचं कळल्यानंतर नाईक यांनी धाडस करून आशा गवळीसह मोबीन, सूरज आणि इतर साथीदारांविरोधात २२ एप्रिल रोजी गुन्हा नोंदवला.

कोचर यांनी गुन्हा नोंदवल्यानंतर पुणे गुन्हे शाखेने मोबीन मुजावर, सुरज यादव, आणि बाळा पाटारेला अटक केली. या तिघांच्या चौकशीतून आशा गवळींचं नाव पुढे आलं. त्यानुसार आशा गवळींना आग्रीपाडा पोलिसांनी पुण्यात चौकशीला हजर राहण्याबाबत नोटीस पाठवली. मात्र अटक टाळण्यासाठी आशा गवळी यांनी खेड न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे न्यायालयाने आशा गवळी यांना तुर्तास तरी दिलासा दिला असला, तरी नाईक यांनी नोंदवलेला दुसरा गुन्हा हा आशा गवळींसाठी डोकेदुखी ठरू शकतो.


आरोपी कुठले?

या गुन्ह्यात पोलिसांनी गवळी गँगच्या मोबीन मोहम्मद मुजावर, सूरज राजेश यादव आणि बाळा सुदान पाठारे या तिघांना अटक केली. या तिघांपैकी मोबीन हा भायखळाच्या दगडी चाळीतील रहिवासी आहे. सूरज आशा गवळी यांच्या पुण्यातील वडगाव पीर येथील फार्महाऊसवर कामाला आहे. तर बाळा पाठारे हा पुण्यातील अखिल भारतीय सेनेचा युवा पदाधिकारी आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा