ता़डदेव परिसरात एका महिलेने मालकाला ९० हजारांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ताडदेव पोलिसांनी शालू सोनावणे (२९) या महिलेला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपी शालूला २१ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
साकी विहार रोड येथील तुंगा विलेजमध्ये रहायला असलेली शालू ही ताडदेव परिसरातील "हमारी संस्कृती" या खासगी कंपनीमध्ये स्विय सहाय्यकाचं काम पहायची. डिसेंबर २०१६ मध्ये कंपनीच्या मालकाने ताडदेव येथील बॅक आॅफ बडोदा शाखेत डेबिटकार्डची मागणी केली होती. त्यानुसार बॅकेने कंपनीचं डेबिट कार्ड आणि पासवर्ड पोस्टाद्वारे पाठवून दिले. हे डेबिटकार्ड कंपनीतील कर्मचाऱ्याने शालूजवळ आणून दिलं.
कंपनीचे मालक कामानिमित्त वारंवार राज्याबाहेर जात असल्यामुळे या डेबिटकार्डद्वारे रेल्वेचं तिकीट बुकिंग केलं जात होतं. त्यामुळे त्या डेबिटकार्डचा पासवर्डही शालूला माहीत होता. कालांतराने कंपनीचं काम कमी झालं होतं. त्याचबरोबर कंपनीची बाहेरील कामं शालूला फारसं जमत नसल्यामुळे मे २०१७ मध्ये शालूला कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला.
नोव्हेंबरमध्ये "हमारी संस्कृती" या खासगी कंपनीचे मिरारोड येथील कार्यालयातून अकाऊंटंटचं काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्याला बँकेतून काढण्यात आलेल्या ९० हजार रुपयांचा हिशोब लागत नव्हता. त्याबाबत त्याने मालकाशी सविस्तर चर्चा केल्यानंतर एटीएम कार्डच आपल्याजवळ नसल्याचं त्याने सांगितलं. त्यानंतर ताडदेव येथील बँकेत जाऊन काढण्यात आलेल्या पैशांची चौकशी केली असता ते पैसे टप्याॉटप्प्याने शालूने काढल्याचं निदर्शनास आलं.
त्यानुसार ताडदेव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून पोलिसांनी शालूला १८ आॅगस्ट रोजी अटक केली. मालकाने कामावरून कमी केल्याच्या रागातूनच आपण हे कृत्य केल्याची कबुली शालूने दिली आहे. या प्रकरणी न्यायालयाने शालूला २१ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.