मुंबईत महिलांवरील अत्याचारात ९५ टक्के वाढ; प्रजा फाऊंडेशनचा अहवाल

२०१७-१८ मध्ये बलात्काराचे ७९२ व विनयभंगाचे २३५८ गुन्हे दाखल झाले आहेत. २०१३-१४ बलात्काराच्या गुन्ह्यांत ८३ टक्के तर विनयभंगाच्या गुन्ह्यांत ९५ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. तसेच लहानमुलांवरील अत्याचाराच्या सर्वेक्षणात लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारात १९ टक्यांनी वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

मुंबईत महिलांवरील अत्याचारात ९५ टक्के वाढ;  प्रजा फाऊंडेशनचा अहवाल
SHARES

मुंबईत महिलांवरील अत्याचारांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं उघड झालं आहे.  २०१३ ते २०१८ या कालावधीत मुंबई महिलांवरील अत्याचार आणि विनयभंगाच्या गुन्ह्यात ९५ टक्यांनी वाढ झाली आहे. प्रजा फाऊंडेशनने मंगळवारी जाहीर केलेल्या अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. तर शहरात दंगलीचे गुन्हे ३६ टक्यांनी वाढलेले असल्याचं प्रजा फाऊंडेशनने अहवालात म्हटलं आहे.

मुलांवरील अत्याचार वाढले

प्रजा फाऊंडेशनच्या अहवालानुसार, २०१३-१४ या वर्षात बलात्काराचे ४३२ , तर विनयभंगाचे १२०९ गुन्हे नोंदवण्यात आले. २०१७-१८ मध्ये बलात्काराचे ७९२ व विनयभंगाचे २३५८ गुन्हे दाखल झाले आहेत. २०१३-१४ बलात्काराच्या गुन्ह्यांत ८३ टक्के तर विनयभंगाच्या गुन्ह्यांत ९५ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. तसंच लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारात १९ टक्यांनी वाढ झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. महिला अत्याचारप्रकरणी २०१६-१७ मध्ये ९२८ व २०१७-१८ मध्ये एक हजार ६२ गुन्हे दाखल झाले आहेत. 


दंगलींच्या गुन्ह्यात वाढ

देशात होणाऱ्या लोकसभा आणि निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मागील काही महिन्यात शहरातही अस्थिर वातावरण असल्याचं दिसून आलं आहे. प्रजा फाऊंडेशनने सादर केलेल्या अहवालानुसार मुंबईत दंगलीच्या गुन्ह्यात ३६ टक्यांनी वाढ झाली आहे. २०१३-१४ या वर्षात मुंबईत दंगलीचे ३८७ गुन्हे दाखल होते. त्यानंतर २०१४-१५ मध्ये ३५३ गुन्हे , २०१५-१६ मध्ये ४५२ गुन्हे , २०१६-१७ ४५४ व २०१७-१८ मध्ये ५२८ गुन्हे दाखल आहेत. दुसरीकडे मुंबईत हत्या, घरफोडी, सोनसाखळी चोरी व वाहनांच्या चोरीत घट झाली आहे.


पोलिसांचा तुटवडा

मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता पोलिस दल  अपुरं पडत असल्याचे अहवाला सांगण्यात आलं आहे. मुंबई पोलिस दलातील विविध विभागांमध्ये २२ टक्के अधिकारी व कर्मचारी कमी आहेत. तपास करणारे सहायक उपनिरीक्षक (३३ टक्के), उपनिरीक्षक(३५ टक्के), सहायक निरीक्षक (३२ टक्के) आदी अधिकाऱ्यांची कमतरता आहे. 


पोलिसांवर विश्वास नाही

गुन्हा घडला पण तक्रार दिली नाही अशा मुंबईतील २४ हजार २९० घरांचं प्रजा फाऊंडेशनने नेमलेल्या हंसा रिसर्च संस्थेद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. यामधील ३२ टक्के लोकांनी पोलिस यंत्रणेवर विश्‍वास नसल्याचं सांगितलं. तर २३ टक्के लोकांनी पोलिस अधिकाऱ्यांशी बोलणे अधिक वेदनादायी असल्याचं मत व्यक्त केलं. २५ टक्के लोकांनी समस्या सुटणार नसल्याची मानसिकता तयार झाल्याने  तक्रार केली नसल्याचं सांगितलं आहे. 



हेही वाचा -

कुर्ला इथं गुंडाची गोळ्या घालून हत्या

चंदा कोचर यांची ईडीने केली सलग ११ तास चौकशी




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा