खारघरमधील पांडवकडा धबधब्यात बुडून तरुणाचा मृत्यू

पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याने कुठलाही अनर्थ घडू नये यासाठी पोलिसांनी पांडवकडासह खारघर हीलवर धरणावर जाण्यास बंदी घातली आहे. मात्र, काही पर्यटक या आदेशाला झुगारून चोर रस्त्याने पांडवकडा परिसरात जात असतात.

खारघरमधील पांडवकडा धबधब्यात बुडून तरुणाचा मृत्यू
SHARES

नवी मुंबईतील (navi mumbai) खारघर (kharghar) मधील प्रसिद्ध असणार्‍या पांडवकडा धबधब्यावर (pandavkada waterfall) एका तरुणाचा बुडून मृत्यू (death) झाला. डोहातील खडकात अडकलेला त्याचा मृतदेह फायर ब्रिगेड कर्मचार्‍यांनी बाहेर काढला आहे.  मौसम रामबहादुर घरती (१८) असं मृत तरुणाचं नाव आहे.

मानखुर्द-गोवंडी येथील शाळेतील मित्र गौरव लोखंडे, अखीप खान, सूरज यादव, मौसम घरती, राहील खान हे पाच मित्र मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पांडवकडा धबधब्यावर आले होते. पांडवकडा धबधब्यावर जाण्यासाठी पोलिसांकडून बंदी आहे. मात्र, तरीही हे सर्व तरुण पांडवकडा धबधब्यावर आले. यावेळी गौरव लोखंडे, राहिल खान व मौसम घरती यांनी डोहामध्ये उड्या मारल्या.  मात्र जोरदार पावसाचा आणि वाहत्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने यातील एका तरुणाचा धबधब्यात बुडून मृत्यू झाला आहे.

 पावसामुळे धबधब्याच्या वरच्या भागात पाण्याचा प्रवाह वाढला आणि खाली पोहणारे हे युवक पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाऊ लागले. त्यापैकी गौरव व राहील या दोघा जणांना पोहायला येत असल्याने बाहेर आले. परंतू मौसम घरती हा डोहात बुडाला. 

त्यानंतर घाबरलेल्या इतर मित्रांनी नवी मुंबई कंट्रोलला कळवले. फायर ब्रिगेड आणि खारघर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्यात गळ टाकून तसंच  स्वीमर पाठवून मैसम घऱती याचा शोध घेतला. अखेर बुधवारी सकाळी फायर ब्रिगेड कर्मचाऱ्यांनी डोहातील खडकाखाली अडकलेला मौसम घरती याचा मृतदेह बाहेर काढला.

खारघर मधील पांडवकडा परिसरात अनेक छोटे मोठे धबधबे आहेत. त्याचा आनंद घेण्यासाठी बरेच पर्यटक त्या ठिकाणी येत असतात. मात्र पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याने कुठलाही अनर्थ घडू नये यासाठी पोलिसांनी पांडवकडासह खारघर हीलवर धरणावर जाण्यास बंदी घातली आहे. मात्र, काही पर्यटक या आदेशाला झुगारून चोर रस्त्याने पांडवकडा परिसरात जात असतात. पोलीस बंदोबस्त चुकवून छुप्या वाटेने जाणार्‍या पर्यटकांनावर यापूर्वीही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 



हेही वाचा -

नवी मुंबई विमानतळ : स्थानिकांचे सिडकोला घेराव आंदोलन

डेक्कन एक्स्प्रेस 'विस्टाडोम'सह २६ जूनपासून पुन्हा धावणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा