मुंबईचं ऐतिहासिक वैभव - भाऊ दाजी लाड संग्रहालय


  •  मुंबईचं ऐतिहासिक वैभव - भाऊ दाजी लाड संग्रहालय
SHARE

मुंबई - भायखळा रेल्वे स्टेशनपासून जवळच असलेलं, राणीच्या बागेतलं भाऊ दाजी लाड संग्रहालय म्हणजे 154 वर्षांपासून मुंबईला लाभलेला ऐतिहासिक वारसाच. सुरू झालं, तेव्हा हे संग्रहालय देशातलं तिसरं आणि मुंबईतलं पहिलं-वहिलं ठरलं. काही उत्साही मंडळींनी पुढाकार घेत स्थानिक कलाकारांच्या कलागुणांचं प्रदर्शन आणि प्रोत्साहन यासाठी अशा संग्रहालयाच्या कल्पेनेवर काम सुरू केलं. भाऊ दाजी लाड आणि जॉर्ज बर्डवुड या संग्रहालयाच्या स्थापनेसाठी निर्माण झालेल्या समितीचे सचिव होते. त्या काळात या संग्रहालयासाठी तब्बल 1,16,141 रुपये जमवण्यात आले आणि सुरू झालं व्हिक्टोरिया गिल्बर्ट संग्रहालय. 1975मध्ये या संग्रहालयासाठी लाड यांनी केलेल्या प्रयत्नांना सलाम करण्यासाठी त्यांचंच नाव या संग्रहालयाला देण्यात आलं. पण लोकाश्रय, देखरेख आणि निधीअभावी हे संग्रहालय मोडकळीस आलं होतं. अखेर 2000मध्ये पुन्हा काही कलाप्रेमी आणि मुंबईवासीयांनी हा वारसा जपण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांना बजाज फाउंडेशनचीही साथ मिळाली आणि या संग्रहालयाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यात आलं. त्यामुळे सांस्कृतिक वारसा जपण्याबद्दल दिला जाणारा युनेस्कोचा सर्वोत्कृष्ठ पुरस्कारही या वास्तूला 2005मध्ये मिळाला. सध्या या संग्रहालयाची देखभाल महापालिका आणि खासगी संस्थेमार्फत केली जातेय. मुंबईच्या इतिहासात फेरफटका मारून येण्याची इच्छा झाली, तर या संग्रहालयाला नक्की भेट द्या...

संबंधित विषय
ताज्या बातम्या