Advertisement

चुनाभट्टीच्या हिल रोडवर टाळमृदंगाचा गजर


चुनाभट्टीच्या हिल रोडवर टाळमृदंगाचा गजर
SHARES

आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरीत गुंजणारा विठूनामाचा गजर चुनाभट्टीतील डोंगरावरच्या शाळेत ऐकू आला. डोंगरावरची शाळा म्हणजेच महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती शिक्षण प्रसारक मंडळाकडून चालवल्या जाणाऱ्या एम. एस. के. पूर्व प्राथमिक, एम. एस. के. प्राथमिक विद्यालय आणि एल. के. हायस्कूल.


या शाळेतर्फे 'चला वारीला जाऊया' हा छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शाळेतील सुमारे 2 हजार मुलांपैकी प्राथमिक विभागातील मुलांनी यानिमित्ताने भजन-कीर्तनात सहभाग नोंदवून वारीच्या परंपरेचा अनुभव मुंबईतच घेतला. इंगवले महाराजांच्या कीर्तनाने शाळेत पंढरीचाच माहौल तयार झाला होता आणि त्यात आबालवृद्ध न्हाऊन निघाले.



शाळेतील लहानग्यांनीच विठोबा-रुक्मिणीचा वेष धारण करुन विद्येच्या या मंदिराला पंढरीच्या रुपात परावर्तित केलं होतं. तसंच लहानग्यांनी टाळ आणि चिपळ्यांच्या नादात स्वतःला जल्लोषानं वाहून घेतलं.

कीर्तनाच्या कार्यक्रमानंतर चुनाभट्टी परिसरात वृक्षदिंडी व पालखीसोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सर्व विद्यार्थ्यांबरोबरच पालक आणि शिक्षकांनीही सहभाग घेतला.


या कार्यक्रमासाठी 'मुंबई लाइव्ह' या डिजीटल मीडियाचे कार्यकारी संपादक स्वप्नील सावरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डोंगरावरच्या शाळेचे संस्थापक व अध्यक्ष जितेंद्र गोस्वामी, सरचिटणीस तसेच राज्य सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त प्रमिला गोस्वामी यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा फडतरे यांनीही यावेळी मुलांना प्रथा-परंपरेबरोबरच आधुनिकतेची कास धरण्याचा सल्ला दिला. महापौर पुरस्कार विजेत्या सुरेखा फडतरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले होते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा