Advertisement

नरेपार्कमध्ये लवकरच दादासाहेब फाळकेंचं थीमपार्क


नरेपार्कमध्ये लवकरच दादासाहेब फाळकेंचं थीमपार्क
SHARES

दादर आणि परळचा मुंबईच्या जडणघडणीत फार मोठा वाटा आहे. दादर आणि परळनं सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रांतील चळवळी पाहिल्या आहेत. अनेक ऐतिहासिक वास्तूंचं माहेरघर म्हणून दादर आणि परळची ओळख आहे. दादरमधील काही उद्याने, संस्था, टिळक आणि हँकॉक ब्रीज आणि परळमधील गिरण्या या ऐतिहासिक वास्तू आजही आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी झगडत आहेत. बदलत्या काळानुसार अनेक ऐतिहासिक वास्तू नामशेष होत आहेत. अनेक ब्रिटिशकालीन वास्तूंची दुरवस्था होत आहे. पण महापालिकेनं आता पुढाकार घेऊन ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्याचा मानस केला आहे. या अंतर्गत काही ठिकाणांचं पुनर्वसन केलं जात आहे. त्यापैकीच एक म्हणजे परळमधील भागोजी नरेपार्क. आता याच उद्यानात भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचे थीम पार्क उभारण्यात येणार आहे.

महापालिकेच्या पुनर्विकास प्रकल्पाचा भाग म्हणून दादासाहेब फाळके यांचं थीम पार्क उभारण्यात येणार आहे. १० हजार चौरस मीटर मैदानाचा चौथा भाग थीम पार्कसाठी देण्यात आला आहे. नरेपार्कमध्ये थीम पार्क उभारण्याचा प्लॅन हेरिटेज कमिटीकडे सादर करण्यात आला आहे. हेरिटेज कमिटीची परवानगी मिळाली की लवकरच याचे काम सुरू होईल.

दादासाहेब फाळके यांनी सुरुवातीच्या काळात चित्रपट बनवण्यासाठी वापरलेल्या कॅमेऱ्याची प्रतिकृती थीम गार्डनमध्ये उभारण्यात येणार आहे. भारतीय सिनेमांसाठी त्यांनी दिलेले योगदान आणि त्यांच्या कामाची माहिती देणारे बोर्ड आणि त्यांच्या चित्रपटांचे पोस्टर्स लावण्यात येणार आहेत.

गेली पाच वर्ष मी यासाठी प्रयत्न करत होतो. नरेपार्क इथल्या गार्डनच्या भागातच हे थीम पार्क उभारण्यात येणार आहे. कॅमेरा, रोल किंवा दादासाहेब फाळके यांची प्रतिकृती उभारली जाऊ शकते. एका चांगल्या व्यक्तिमत्वाचा इतिहास, त्यांनी चित्रपटसृष्टीला दिलेले योगदान जगासमोर यावं यासाठी दादासाहेब फाळके यांच्या थीम पार्कची मागणी केली होती. आता हे सर्व पालिकेच्या हाती आहे. तसेच नरेपार्क इथं असलेल्या अभ्यासिकेला अनेक वर्ष झाली आहेत. त्यामुळे ती अभ्यासिका थोडी जीर्ण झाली आहे. त्यामुळे मी नवीन अद्ययावत अभ्यासिका उभारण्याची मागणी केली होती. त्या मागणीनुसार त्याचं टेंडर पास झालं आहे. लवकरच अभ्यासिकेचंही काम होणार आहे.

 -नाना आंबोले, माजी नगरसेवक

थीम पार्कशिवाय दादर आणि परेल या भागात एक हेरिटेज वॉकसुद्धा महापालिका आयोजित करणार आहे.

मुंबई ही दादासाहेब फाळके यांची कर्मभूमी आहे. दादर पूर्व इथल्या मथुरा भवनमध्ये त्यांच्या पहिल्या चित्रपटाचं शुटिंग झालं होतं. त्यांच्या स्मृतीनिमित्त परेल इथल्या नरेपार्कमध्ये गार्डनमध्ये थीम पार्क उभारण्याचा पालिकेचा मानस आहे. प्लेग्राऊंड आहे त्याच्या बाजूला छोटेसे गार्डन आहे तिकडेच थीम पार्क उभारण्यात येईल. नरेपार्कच्या पुनर्विकासासाठी अंदाजे २-३ कोटी खर्च येणार आहे. तसेच हेरिटेज पॉईंट्स म्हणजे पुरातन वास्तू आहेत तिकडे हेरिटेज वॉक सुरू करणार आहोत. नरेपार्क आणि हेरिटेज वॉक हे दोन्ही प्लॅन हेरिटेज कमिटीला सादर करण्यात आले आहेत. त्यांची परवानगी मिळाली की लवकरच काम सुरू होईल. अंदाजे पावसाळ्यानंतर म्हणजेच ऑक्टोबरमध्ये याचं काम सुरू होऊ शकतं.

 -विश्वास मोटे, सहायक नगरपालिका आयुक्त

नरेपार्क, हाफकिन इन्स्टिट्यूट, केइएम हॉस्पिटल आणि मथुरा भवन या मार्गांचा समावेश हेरिटेज वॉकमध्ये करण्यात आला आहे.


नरेपार्क

नरेपार्क हा कामगार चळवळीचा आत्मा होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अनेक सभा या मैदानावर झाल्या. हेच ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता नरेपार्क मैदानाला हेरिटेज वास्तूंमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. आता लवकरच इथे दादासाहेब फाळके यांच्या चित्रपटातील योगदानाबद्दल माहिती मिळणार आहे.


हाफकिन इन्स्टिट्यूट

विविध रोगांवर लसी निर्माण करणारी आणि प्रशिक्षण देणारी भारतातील संशोधन संस्था. हाफकिन इन्स्टिट्यूटच्या सध्याच्या इमारतीचे बांधकाम १६७३ मध्ये पोर्तुगीजांनी फ्रान्सिस्कन मठासाठी केले होते.

१८९६ मध्ये मुंबईत उद्भवलेल्या प्लेगच्या साथीवर लस शोधण्यासाठी ब्रिटिश सरकारनं वॉल्डेमार मॉर्डीकाय वुल्फ हाफकिन या शास्त्रज्ञांना बोलावलं. सुरुवातीला हाफकिन यांनी आपलं संशोधन ग्रँट मेडिकल कॉलेजमधील प्रयोगशाळेत सुरू केलं. तीन महिन्यात त्यांना प्लेगवर लस शोधण्यात यश मिळालं. पण नंतर त्यांना कामासाठी प्रयोगशाळा अपुरी पडू लागली. शेवटी १൦ ऑगस्ट १८९९ मध्ये ‘गव्हर्नमेंट हाउस’ या इमारतीत हाफकिन यांची 'प्लेग रिसर्च लॅबोरेटरी' प्रस्थापित करण्यात आली. हाफकिन यांच्या सेवानिवृत्तीनंतर १൦ वर्षांनी म्हणजेच १९२५ मध्ये सन्मानाप्रीत्यर्थ या प्रयोगशाळेचे नाव 'हाफकिन इन्स्टिट्यूट' असे करण्यात आले.


केईएम हॉस्पिटल

केईएम जवळील एस. ए. राव मार्गालगत उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना एक मैलाचा मोजमाप दर्शवणारा ब्रिटिशकालीन दगड सापडला होता. दोन ठिकाणांमधील अंतर मोजण्यासाठी ब्रिटिशांनी हा दगड उभारला होता. तीन महिन्यांपूर्वी सापडलेल्या या दगडाची डागडुजी करण्यात येतेय. हा दगड पुन्हा एस. ए. राव मार्गावर ठेवण्यात येईल.


मथुरा भवन

'राजा हरिशचंद्र' (१९१३) या चित्रपटाचे चित्रिकरण दादासाहेब फाळके यांनी मथुरा भवन इथेच केलं होतं. चाळीच्या शेवटच्या टोकाला मथुरा भवन हा बंगला होता. पण आता तिथं इमारती उभ्या आहेत. पण सध्या इथे असणारं 'मथुरा भवन' जमीनदोस्त झालं आहे. काही महिन्यापूर्वी बंगल्याच्या सुरुवातीला असणारी चाळ देखील जमीनदोस्त करण्यात आली. 

पहिल्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी दादासाहेब फाळके जागेच्या शोधात होते. दादरमध्ये मथुरा नानकजी नावाच्या माणसाचा बंगला त्यांच्या नजरेस पडला. 'मथुरा भवन' असं या बंगल्याचं नावं. दादासाहेब फाळके यांना बंगला आवडलाही. त्यांनी तो बंगला भाड्यानं घेऊन तिकडे फाळके स्टुडिओ उभारला. त्याच जागी दादासाहेब फाळके यांनी त्यांच्या पहिल्या चित्रपटाचे शुटिंग केले होते.

दादासाहेब फाळके थीम पार्क उभारण्यात येणार आहे ही खरंच खूप चांगली बातमी आहे. आत्तापर्यंत त्यांचं नाव रस्त्याला आणि गोरेगाव येथील चित्रपट सृष्टीला देण्यात आलं आहे. पहिल्यांदाच एका उद्यानात त्यांचं थीम पार्क उभारण्यात येणार आहे. यामुळे त्यांच्या कामाची माहिती अधिक लोकांपर्यंत पोहोचेल. चित्रपटसृष्टीचे जनक ही त्यांची ओळख आहे. पण त्यांची दुसरी ओळख म्हणजे व्यायामपटू. त्यांना व्यायामाची खूप आवड होती. त्यामुळे जिथे व्यायाम करायला नागरिक येतात तिथेच अशा प्रकारचं थीमपार्क उभारणं ही खरंच चांगली संकल्पना आहे. 

 -चंद्रशेखर पुसाळकर, दादासाहेब फाळकेंंचे नातू

भारतीय सिनेमाचे जनक

दादासाहेब फाळके हे चित्रपटनिर्मिती करणारे भारतातील पहिले चित्रपट निर्माते होते. त्यामुळे त्यांना भारतीय चित्रपटांचा जनक मानले जाते. १९१३ मध्ये त्यांनी राजा हरिशचंद्र हा पहिला मूकपट तयार केला. १९३७ पर्यंतच्या १९ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ९५ चित्रपट आणि २६ लघुपटांची निर्मिती केली. त्यांच्या याच योगदानाचा सन्मान म्हणून त्यांच्या नावाने भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च असा 'दादासाहेब फाळके' पुरस्कार दिला जातो.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा