काळेवाडीचा बाप्पा देतोय अवयवदानाचा संदेश!


  • काळेवाडीचा बाप्पा देतोय अवयवदानाचा संदेश!
SHARE

भारताला खरंतर प्राचीन काळापासूनच अवयवदानाचा वारसा आहे. अनेक कथांमधून त्याचे अनेक पैलू देखील उलगडत गेले आहेत. पण, 21 व्या शतकात आपल्याला पुन्हा एकदा अवयवदानासाठीची जनजागृती करुन देण्याची गरज भासली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील काळाचौकीतील काळेवाडी इथल्या गंगाधर दत्तात्रय आंबेकर म्हणजेच गं. द. आंबेकर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने या वर्षी अवयवदानाचा संदेश देणारा देखावा आणि चलचित्र साकारलं आहे. त्या देखाव्यातून हे मंडळ अवयवदान रक्तदानाएवढंच महत्त्वाचं आहे,  असा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे.  

यंदा या मंडळाचं तिसरं वर्ष आहे. परदेशात अवयवदानाचं खूप महत्त्व आहे. पण, भारतात अजूनही अवयवदानाबाबत जागृती नाही. त्यामुळे सरकारसह सर्वच खूप प्रयत्नशील आहे. म्हणून आपणही या मोहिमेत सहभागी होऊन अवयवदानाविषयी जनजागृती केली पाहिजे, अशी भावना या मंडळातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

अवयवदान करणं खूप महत्त्वाचं आहे. जोपर्यंत स्वत:वर अशी परिस्थिती ओढवत नाही, तोपर्यंत आपल्याला त्याचं गांभीर्य कळत नाही. म्हणून आपण सर्वांनीच अवयवदान या मोहिमेकडे गंभीरतेने पाहिलं पाहिजे. 

रमेश काळे, अध्यक्ष, गं. द. आंबेकर गणेशोत्सव मंडळ

या सार्वजनिक मंडळाने गणेशोत्सवाद्वारे चलचित्रातून अवयवदानाविषयी महत्त्वाचा संदेश दिला आहे. अवयवदान करणं ही आजच्या काळाची गरज असल्याचं मत या मंडळाचे चिटणीस सत्यविजय मयेकर आणि मंडळाचे सदस्य यांनी मुंबई लाइव्हकडे व्यक्त केलं आहे.  शिवाय, आजही बरेच जण आहेत ज्यांना किडनी, यकृत, डोळ्यांची गरज आहे. पण, अवयवदाता उपलब्ध होत नसल्याकारणाने अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. म्हणून फक्त गणपतीचे 10 दिवस अशी जनजागृती करुन काही साध्य होणार नाही. आपल्याला सर्वतोपरी प्रयत्न करणं गरजेचं आहे,  अशी इच्छाही काळे यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना व्यक्त केली.

भारतात जवळपास 5 लाख लोकांना अवयवांची गरज आहे. पण, फार थोडे अवयव दरवर्षी उपलब्ध होतात. समाजात असणारी अंधश्रद्धाही यामागचं मोठं कारण आहे. ज्याने या जन्मी अवयवदान केलं, त्याला पुढच्या जन्मी तो अवयव देव देणार नाही, अशा प्रकारच्या अंधश्रद्धांना मागे ठेवून अवयवदानाच्या मोहिमेत आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे.हेही वाचा

लॉर्ड विजय करणार अवयवदानासाठी चेन्नई ते लडाख प्रवास


संबंधित विषय
ताज्या बातम्या