Advertisement

होळीची परंपरा जपणारे मुंबईतील कोळीवाडे

'होळी' अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून, मुंबईसह राज्यभरात मोठ्या उत्साहात तयारीला सुरूवात झाली आहे

होळीची परंपरा जपणारे मुंबईतील कोळीवाडे
SHARES

'होळी' अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून, मुंबईसह राज्यभरात मोठ्या उत्साहात तयारीला सुरूवात झाली आहे. सर्व ठिकाणी होळीची लाकडं, सुके गवत यांसह इतर वस्तू गोळा करण्यास सुरूवात झाली आहे. होळीचा सण हा देशभरात उत्साहात साजला केला जात असला, तरी होळीचा सण हा कोळी समाजाचा प्रमुख सण मानला जातो. मुंबईतील कोळीवाड्यांमध्ये अगदी जुन्या पारंपरिक पद्धतीनं आजही होळी साजरी करण्यात येते.

मुंबईतील कोळीवाड्यांमधील होळीचं एक वेगळंच वैशिष्ट्यं आहे. होळीच्या एक दिवसआधीच होळी पेटवली जाते. मुंबईतल्या पहिल्या होळीचा मान वरळी कोळीवाड्याला असल्यानं ही मानाची होळी एक दिवस अगोदर शतकानुशतकं साजरी होतं आहे. यावेळी कोळीवाड्यातील प्रत्येक ठिकाणी मोठी होळी उभारली जाते. पारंपारिक पद्धतीनं पूजा करून होळीभोवती फेऱ्या मारतात.

मुंबईतील वेसावे गावच्या होळीची मजा आणि पारंपरिक थाट काही औरच आहे. येथे पारंपारिक पद्धतीनं साजरी करण्यात येणारी होळी पाहण्यासाठी परदेशी पाहुणे आवर्जून वेसाव्यात येत असतात. गोताच्या किंवा पाटलांच्या हावलाच्या दिवशी पारंपरिक वेशभूषेत मडकी मिरवणूक काढली जाते. ज्यात वेसावे गावातील बाजार गल्ली व मांडवी गल्ली जमातीचा सहभाग असतो. कोळी महिला पारंपरिक वेशभूषा परिधान करून डोक्यावर रंगीत मातीचे मडके घेऊन गावात मिरवतात.

या कोळीवाड्यात पुरुष मंडळी विविध देवी-देवतांचे अथवा इतर सोंग घेत सादर करत अथवा गाणी म्हणत गावात फिरतात. त्यांना साथ असते ती सुमधूर कोळीगीत वाजवणाऱ्या कोळी बँड पथकांची.

मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या होळी उत्सवांपैकी एक शिवडी-कोळीवाड्याची होळी देखील प्रसिद्ध आहे. ही होळी स्वतंत्र्यपूर्व काळापासून साजरी केली जाते. होळी हा उत्सव साजरा करण्यासाठी येथील महिला एकच प्रकारचे आणि रंगांचे कपडे परिधान करून तसेच सजावट केलेलं माठ डोक्यावर घेऊन परिसरात वाजत, गाजत मिरवणूक काढतात. यात बच्चेकंपनीही आनंदानं सहभागी होतात. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने उभ्या केलेल्या या होळीच्या भोवती फेऱ्या मारून प्रत्येक महिला होमात डोक्यावर घेतलेल्या त्या माठांचे दहन करतात.

होळी हा सण सोमवार ९ मार्च रोजी संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येणार आहे. होळीच्या दिवशी नागरिक आपआपसातील वैर विसरून एकमेकांना रंग लावून जुने राग, रोष विसरून जातात तर होळीला वाईटावर चांगल्याच गोष्टीचा विजय होतो असं म्हटलं जातं.हेही वाचा -

महिला अत्याचारांच्या खटल्यासाठी ४८ विशेष न्यायालय स्थापन करणार - अनिल देशमुख

PNB घोटाळा : नीरव मोदीच्या संपत्तीचा आज लिलाव, लिलाव थांबवण्यासाठी मुलाची बॉम्बे कोर्टात धावसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा