Advertisement

इतिहासात पहिल्यांदाच राज्यातील मंदिर बंद

राज्य सरकारनं दिलेल्या सुचनेनुसार राज्यातील अनेक मंदिरं बंद करण्यात आली आहेत. त्यामुळं लाखो भाविकांना देवाचं दर्शन करता येत नाही.

इतिहासात पहिल्यांदाच राज्यातील मंदिर बंद
SHARES

मुंबईसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसमुळं अनेकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या भयंकर पहिल्यांदाच राज्य सरकारनं दिलेल्या सुचनेनुसार राज्यातील अनेक मंदिरं बंद करण्यात आली आहेत. त्यामुळं लाखो भाविकांना देवाचं दर्शन करता येत नाही. तसंच, दर्शनासाठी भक्तांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. तर चला जाणून घेऊयात अशाच काही मंदिरांची माहिती...

सिद्धिविनायक मंदिर, प्रभादेवी

पहिल्यांदाच एका व्हायरसमुळं मुंबईच्या लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं सिद्धिविनायक मंदिर बंद करण्यात आला आहे. २१ दिवस बंद असल्यानं भाविकांना बाप्पाचं दर्श घेता येणार नाही. १९ नोव्हेबर १८०१ साली या मंदिराचं बांधकाम करण्यात आलं होतं. 

साई समाधी मंदिर, शिर्डी

भारतासह जगभरातील लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. साईबाबांच्या दर्शनावेळी अनेक भाविक मौल्यवान वस्तू, पैसे दान करतात. परंतु, कोरोना या विषाणूमुळं हे मंदिर बंद करण्यात आलं आहे. दरवर्षी राज्यभरातील अनेक भागांमधून लाखो भाविक वाजत गाजत साईबाबांची पालखी काडून रामनवमीच्या दिवशी साईबाबांच्या चरणी पोहोचत. परंतु, यंदा कोरोनाच्या सावटामुळं पालखी काढण्यात आली नाही.     

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, पंढरपूर

सध्या जगभरात करोनाने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपुरात या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रशासनाने खबरदारीचे उपाय सुरु केले आहेत. लाखो वैष्णवांचं श्रद्धास्थान असलेल्या सावळ्या विठूरायाच्या मंदिर देखील खबरदारी म्हणून बंद करण्यात आलं आहे. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असून लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासन सुरुवातीपासून खबरदारी घेत आहे. 

कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर बंद करण्यात आलं आहे. महालक्ष्मी मंदिर हे फक्त महाराष्ट्रातील नाही तर देशातील महत्त्वाच्या देवस्थानांपैकी एक आहे. 

खंडोबा मंदिर, जेजुरी 

जेजुरीच्या खंडेरायाचं मंदिरही बंद करण्यात आलंय. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ आणि मानकऱ्यांनी हा निर्णय घेतला. त्यामुळं कोरोनाचं सावटं जात नाही तोपर्यंत हे जेजुरीचं मंदिर भाविकांसाठी बंद असणार आहे.

महागणपती मंदिर, टिटवाळा 

टिटवाळ्याचं महागणपती मंदिर जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे दररोज इथे हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र, कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून टिटवाळा महागणपती मंदिर अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय विश्वस्तांनी घेतला आहे. 

सप्तश्रृंगी देवी मंदिर, वणी 

सप्तश्रृंगी निवासीनी ट्रस्ट, प्रशासन आणि ग्रामपंचायतीन चैत्र उत्सव रद्द केला आहे. देवीच्या दर्शनासाठी गडावर येणाऱ्या भाविकांसाठी देवीचं दर्शन बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय ग्रामस्थ आणि ट्रस्ट यांच्यात घेण्यात आला आहे. ट्रस्टचे अन्न छत्रालय तसेच भाविकांच्या निवासाची सोय असलेले संकुल बंद ठेवण्यात येणार आहे. देवीचं मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आलं असलं तरी देवीच्या नित्यपुजा मात्र सुरु राहणार असल्याच ट्रस्टतर्फे कळविण्यात आलं आहे.

तुळजापूर मंदिर

तुळजाभवानीचं मंदिर विधिवत पूजा करुन दर्शनासाठी बंद करण्यात आलं. सरकारचा पुढील आदेश येईपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन आणि मंदिर संस्थानाने घेतला आहे. मुंबईसह राज्यभरातील लाखो भाविक दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी करतात. 

गजानन महाराज मंदिर, शेगाव

कोरोनाच्या प्रादुर्भाव मोठा प्रमाणात वाढत आहे. त्याला रोखण्यासाठी सरकारनं मंदिरांना केलेल्या आवाहनाला शेगावच्या गजानन महाराज मंदिरानंही प्रतिसाद दिला आहे. बुलडाणातील शेगावमधील गजानन महाराजांची दर्शन बंद करण्यात आलं आहे. तर गजाजन महाराज संस्थानचे सर्व उत्सव आणि कार्यक्रमही बंद करण्यात आले आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा