Advertisement

‘लगीनघाई’ करा, पुढच्या वर्षी विवाहमुहूर्त कमी!


‘लगीनघाई’ करा, पुढच्या वर्षी विवाहमुहूर्त कमी!
SHARES

भारतात शुभ मुहूर्तावर लग्न करण्याची प्रथा आहे. जोपर्यंत शुभ मुहूर्त निघत नाही, तोपर्यंत विवाह इच्छुकांचे विवाह पार पडत नाही. त्यातच चातुर्मासात तर विवाहाचे मुहूर्तच निघत नाहीत! नुकतेच चातुर्मासाचे चार महिने उलटले आहेत. त्यामुळे निश्चितच तुम्ही वयात आलेल्या तरुण-तरुणींचे लग्न लावण्याच्या तयारीत असाल. पण यावेळी जरा घाई करावी लागणार आहे. कारण यंदा विवाह मुहूर्ताचा कालावधी फारच कमी आहे.


चातुर्मास कशाला म्हणतात?

आषाढच्या पंधरा दिवसांनंतर ते श्रावण, भाद्रपद, आश्विन या चार महिन्यांच्या कालावधीला चातुर्मास म्हटले जाते. या चातुर्मासात लग्नाचा कोणताच मुहूर्त नसतो. त्यामुळे भारतात सामान्यपणे चातुर्मासात विवाह लावले जात नाहीत.

चातुर्मासाचा कालावधी उलटल्यानंतर तुळशीचे लग्न लावले जाते आणि त्यानंतर भारतात लग्नसराईला सुरुवात होते. आता चातुर्मास संपला आहे. नुकताच तुलसी विवाह पार पडला. आता विवाह मोसमाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे तुम्ही विवाहइच्छुकांचे लग्न लावण्याच्या तयारीत असाल तर घाई करा. कारण गुरुअस्तामुळे विवाह मुहूर्त निघत नसल्याचे पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले आहे.


तुलसी विवाह पार पडल्यानंतर आता विवाह मोसम जरी सुरू होणार असला, तरी पुढच्या वर्षी ज्येष्ठ अधिकमास, चतुर्मास, गुरू-शुक्र ग्रहाचा अस्त यामुळे कमी विवाहमुहूर्त आहेत. त्यामुळे विवाहेच्छुकांना 'लगीनघाई' करावी लागणार आहे.

दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक


याविषयी अधिक माहिती देतांना सोमण म्हणाले की, '१५ डिसेंबर २०१७ ते १ फेब्रुवारी २०१८ पर्यंत शुक्र ग्रहाचा अस्त आहे. १६ मे २०१८ ते १३ जून २०१८ ज्येष्ठ अधिकमास आहे. २३ जुलै २०१८ ते २० नोव्हेंबर २०१८ चतुर्मास आहे. तसेच १५ नोव्हेंबर २०१८ ते ६ डिसेंबर २०१८ गुरू ग्रहाचा अस्त आहे. त्यामुळे या कालात विवाहमुहूर्त नाहीत.

नोव्हेंबर २०१७ मध्ये ५, डिसेंबर २०१७ मध्ये ५ विवाहमुहूर्त आहेत. जानेवारी २०१८ मध्ये शुक्रअस्तामुळे विवाह मुहूर्त नाहीत. फेब्रुवारी २०१८ मध्ये ८, मार्च २०१८ मध्ये ७ , एप्रिल २०१८ मध्ये ८, मे २०१८ मध्ये ९, जून २०१८ मध्ये ४, जुलै २०१८ मध्ये ६ विवाह मुहूर्त आहेत. ऑगस्ट, सप्टेंबर, आॅक्टोबर, नोव्हेंबर मध्ये विवाह मुहूर्त नाहीत. डिसेंबर २०१८ मध्ये १० विवाहमुहूर्त असल्याचे श्री. दा. कृ. सोमण यांनी सांगितले.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा