Advertisement

पालिका शाळेतल्या 4थी आणि 7वीच्या सर्वच मुलांना नेणार सहलीला!


पालिका शाळेतल्या 4थी आणि 7वीच्या सर्वच मुलांना नेणार सहलीला!
SHARES

मुंबई महापालिका शाळांमधील इयत्ता चौथी आणि सातवीच्या सर्वच विद्यार्थ्यांना यंदा सहलीला नेले जाणार आहे. घाटकोपर येथील किडझानिया थीम पार्कमध्ये ही सहल जाणार आहे. आजवर चौथी आणि सातवीच्या वर्गांमधील केवळ दहा टक्केच विद्यार्थ्यांना सहलीला नेले जात असे. परंतु, यंदा या इयत्तेतील १०० टक्के मुलांना सहलीला नेले जाणार आहे.



महापालिका शाळांमधील काही मोजक्याच वर्गातील मुलांना शैक्षणिक सहलीला नेले जात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी आक्षेप घेत सर्वच मुलांना सहलीला न्यावे, अशी मागणी केली होती.



किडझानिया एक सुरक्षित तसेच एक चांगल्या दर्जाचे इनडोअर थीमपार्क आहे. यातून मुलांना प्रेरणा मिळते. तसेच याठिकाणी खेळता खेळता मुलांना सर्वच बाबींचे ज्ञान दिले जाते. यामध्ये बँक, हॉस्पिटल, पोलिस स्टेशन, फायर स्टेशन, विमान चालक अकादमी आणि रंगमंच समाविष्ट आहे, असे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी स्पष्ट केले.



या विद्यार्थ्यांना बँकेच्या कामकाजाच्या माहितीसह बिस्कीट कंपनी, बॉटलिंग प्लांट, मँगो ड्रिंक फॅक्टरी, डोनट्स बनवणे, पिझ्झा शॉप, बर्गर शॉप, चॉकलेट फॅक्टरी आणि बजाज रेसिपी इत्यादींची माहिती व कार्यानुभव दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रत्येक विद्यार्थ्यामागे ३२५ रुपये असे शुल्क किडझानिया पार्कमध्ये आकारले जाणार आहे. सध्या चौथी आणि सातवीच्या महापालिका शाळांमध्ये तब्बल ७३ हजार ४१४ विद्यार्थी असून या सहलीच्या खर्चावर १ कोटी ५२ लाख ३८ हजार ६६५ एवढा खर्च केला जाणार आहे.



हेही वाचा

मुंबई महापालिका शाळांमध्ये आता केम्ब्रिजचा अभ्यासक्रम!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा