Advertisement

१३ 'ओजस आंतरराष्ट्रीय शाळां'ची नावे जाहीर


१३ 'ओजस आंतरराष्ट्रीय शाळां'ची नावे जाहीर
SHARES

चंद्रपूरउस्मानाबादसध्याच्या स्पर्धात्मक युगात राज्यातील विद्यार्थी कुठे मागे पडू नये या उद्देशाने शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांना येत्या २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण देण्यासाठी 'ओजस आंतरराष्ट्रीय शाळांची' सुरुवात करणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यातील जिल्हा परिषदेच्या १३ ओजस आंतरराष्ट्रीय शाळांची यादी शनिवारी जाहीर करण्यात आली आहे. यात अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे या विभागांचा समावेश आहे. त्यात ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील खर्डी नं १ या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची निवड करण्यात आली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी 'ओजस आंतरराष्ट्रीय शाळांची' सुरुवात करणार असल्याची घोषणा केली होती.


पहिला टप्पा म्हणून १३ शाळांची निवड

स्थानिक स्वराज्य संस्था, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग व शालेय शिक्षण विभाग यांच्या शाळांमधून आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या १०० शाळा निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून १३ शाळांची निवड करण्यात आली आहे.


'या' आहेत १३ शाळा

विभाग जिल्हा शाळा
अमरावतीबुलडाणाचिखली वरखेड जि.प. शाळा
 वाशिमवाशिम साखरा जि.प. शाळा
औरंगाबादउस्मानाबादकळंब शिराढोण जि.प. शाळा
परभणी पाथरी माळीवाडा जि.प. शाळा
कोकण ठाणेशहापूर खर्डी नं. १ जि.प. शाळा
सिंधुदुर्गसावंतवाडी चराठे जि.प. शाळा
नागपूरचंद्रपूरचिंचाळा जि.प. शाळा
 गोंदिया गोरेगाव शहीद जानया तिमया जि.प. शाळा
नाशिकनंदूरबारधडगाव तोरणमाळ आंतरराष्ट्रीय निवासी शाळा
नाशिकचांदवड भोये गाव जि.प. शाळा
पुणेकोल्हापूरभुदरगड खानापूर येथील विद्यामंदिर
पुणेशिरूरवाबळेवाडी जि.प. शाळा
सातारावाईबोपर्डी जि.प. शाळा


आंतरराष्ट्रीय शाळांसाठी १०६ शाळांचा अर्ज

'ओजस आंतरराष्ट्रीय शाळां'साठी १०६ शाळांनी अर्ज केला होता. या अर्जांपैकी विविध विभागातून उत्कृष्ट कामगिरी असणाऱ्या १३ शाळांची निवड करण्यात आली आहे. लवकरच या शाळांना आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात येणार असून तेथील शिक्षण पद्धतीत आवश्यक बदल करण्यात येणार आहे.


बालवर्गापासून ते तिसरीपर्यंत अभ्यासक्रम

आंतरराष्ट्रीय शाळांचा हा अभ्यासक्रम बालवर्गापासून ते तिसरी इयत्तेपर्यंत शिकवला जाणार आहे. त्यासाठी प्रशिक्षित शिक्षकही उपलब्ध करून दिलं जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण मिळणार आहे. यामुळे सरकारी शाळेत प्रवेश न घेता खासगी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्याही कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


शिक्षक, मुख्याध्यापकांना संधी

राज्य सरकारच्या या उपक्रमामध्ये योगदान देण्यास इच्छुक आणि ओजस आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या, तसेच सध्या सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, अनुदानित प्राथमिक शाळांमध्ये कार्य करणारे उत्कृष्ट शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याकडून ७ मे पर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत. या अर्जामधून काही निवडक शिक्षक, मुख्याध्यापक यांना १० मे ला पुण्यातील महाराष्ट्र विद्या प्राधिकरण येथे निवड कार्यशाळेसाठी बोलवले जाणार आहे. त्यानंतर अंतिम निवड झालेल्या शिक्षक, मुख्याध्यापकांचे १४ मे ते २ जूनपर्यंत मुंबईत निवासी प्रशिक्षण होणार आहे.

अर्ज https://www.research.net/r/KLCNDBY या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा