Advertisement

बालभारती@ ५० वर्षे


बालभारती@ ५० वर्षे
SHARES

पहिल्याच दिवशी शाळेत गेल्यावर झालेल्या अक्षर ओळखीपासून ते मराठी साहित्य म्हणजे काय? इथपर्यंत सगळी ओळख करून देण्याचे काम करणाऱ्या बालभारतीला आज ५० वर्ष पूर्ण होत आहेत. लेखी पुस्तकांपासून सुरू झालेला हा प्रवास आज इ-बुकपर्यंत येऊन पोहोचला आहे. आणि आज २७ नोव्हेंबरला आपली बालभारती पन्नाशीत प्रवेश करतेय.

बालभारती म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ती पुस्तकातील छोटी छोटी वाक्य. अगदी 'छगन घर बघ’, ’कमल नमन कर’, ’राम हरण धर’ अशी वाक्य आजही आपल्याला आठवतील. त्यानंतर बालभारतीने शिकवलेल्या बडबड गीतांमुळे आजही बालभारतीशी नाते घट्ट टिकून आहे. एकदा शाळेत आलेल्या मुलाला बालभारती नवनवीन गोष्टी शिकवत असते. बडबड गीतांपासून झालेली सुरवात पुढे आपल्याला वेगवेगळे साहित्यकार, कवींशी ओळख करून देते. केवळ मराठी भाषाच नाही, तर गणित, विज्ञान, समाजशास्त्र या विषयांची ओळखही बालभारतीनेच आपल्याला करून दिली.

पुढे काळ बदलला तसे बालभारतीचे रूपही बदलले. लेखी साहित्याबरोबर इ- बुकची निर्मिती बालभारतीने केली. सध्या पहिली ते आठवी पर्यंतची बालभारतीची पुस्तकं इ-बुक स्वरूपात उपलब्ध आहेत. केवळ मराठी भाषेतच नाही, तर इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तेलुगु आणि सिंधी अशा आठ भाषांमध्ये बालभारती पुस्तकांची निर्मिती करते.


बालभारतीची 'किशोर'निर्मिती

पाठयपुस्तकांप्रमाणेच मुलांच्या लाडक्या 'किशोर' मासिकाची निर्मितीही बालभारतीकडूनच केली जाते. १९७३ मध्ये 'किशोर'चा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. केवळ दरमहिन्याला नाही, तर दिवाळीत खास 'किशोर दिवाळी विशेष' अंकाची मेजवानी वाचकांना दिली जाते.

बालभारतीमध्ये ६ वर्षे मी संचालकपदी होतो. आज आपली बालभारती ५० वर्षांची झालीये. आजही बालभारती वाचकांची तेवढीच लाडकी आहे. आता 'किशोर' हे मासिकसुध्दा डिजिटल स्वरूपात येत आहे. त्यामुळे 'किशोर'च्या वाचकांसाठी ही पर्वणीच ठरेल.

वसंत कालपांडे, माजी संचालक, बालभारती


अनेक पाठ्येतर पुस्तकं प्रकाशित

बालभारतीकडून पाठ्यपुस्तकाव्यतिरीक्त इंग्रजी-मराठी शब्दकोश, निवडक बालभारतीचे १४ खंड, दादासाहेब रेगे आणि राधाबाई शेवडे या आदर्श शिक्षकांची आत्मवृत्ते, कथा स्वातंत्र्याची, वंदे मातरम्, ग्रामगीता, लघुखेळ, स्वसंरक्षण अशी अनेक पुस्तके बालभारतीने प्रकाशित केली आहेत.


बालभारतीचा इतिहास

२७ जानेवारी १९६७ रोजी बालभारतीची स्थापना झाली. तर १९७१ मध्ये पहिले पुस्तक प्रकाशित करण्यात आले. पहिली ते बारावीपर्यंत पुस्तकांची निर्मिती करणारे 'महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि संशोधक मंडळ' असे या संस्थेचे नाव आहे. पण आजही ते 'बालभारती' या नावाने ओळखले जाते.हेही वाचा

आश्रमशाळेतील मुलंही बोलणार फाडफाड इंग्रजीसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा