सीबीएसई बोर्ड १२वीचा निकाल जाहीर, गाझियाबादची मेघना श्रीवास्तव देशात पहिली


SHARE

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल शनिवारी २६ मे रोजी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. cbse.examresults.net, cbseresults.nic.in, results.gov.in या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. सीबीएसईने जाहीर केलेल्या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर विद्यार्थ्यांना रोल नंबर, स्कूल नंबर, सेंटर नंबर टाकल्यानंतर निकाल पाहता येणार आहे. बारावीचा निकाल ८३.०१ टक्के इतका लागला असून गाझियाबादमधील मेघना श्रीवास्तव हिने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तिला ५०० पैकी ४९९ मार्क्स मिळाले आहेत.


मेसेजवरही कळू शकतो निकाल

मोबाईल मेसेजवरही तुम्हाला निकाल पाहता येणार असून cbse12 स्पेस rollno स्पेस sch no स्पेस center no असं टाईप करून 7738299899 या नंबरवर पाठवता येऊ शकतो. तसंच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मायक्रोसॉफ्टने एक खास अॅप बनवलं असून विद्यार्थी तिथेही आपला निकाल पाहू शकतात. विद्यार्थ्यांना सीबीएसई बोर्डाने जाहीर केलेल्या अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहता येणार असून त्याची प्रिंट आउटही तुम्हाला काढता येईल.


११ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी

या परीक्षेला ११ लाख ८६ हजार ३०६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून ही परीक्षा ५ मार्च ते १३ एप्रिल दरम्यान घेण्यात आली होती. दरम्यान, ही परीक्षा देशातील ४ हजार १३८ परीक्षा केंद्रावर; तर परदेशातील ७१ केंद्रांवर पार पडली होती.

संबंधित विषय
ताज्या बातम्या