Advertisement

मुजोर शाळेला बालहक्क आयोगाचा दणका


मुजोर शाळेला बालहक्क आयोगाचा दणका
SHARES

विक्रोळी - बालहक्क आयोगाने विक्रोळीतल्या कन्नमवारनगर-1 मधील मनोहर कोतवाल ट्रस्ट माध्यमिक शाळेला चांगलाच दणका दिला आहे. फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना जमिनीवर बसवण्यासह चक्क शाळेत डांबून ठेवण्याचा प्रताप करणाऱ्या या मुजोर शाळेच्या चौकशीचे आदेश बालहक्क आयोगाने शिक्षण उपसंचालकांना दिले आहेत. शाळेची चौकशी करत 10 दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचेही आदेश आयोगाने शिक्षण उपसंचालकांना दिले आहेत. आयोगाच्या या निर्णयामुळे पालकांना आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या शाळेत पायाभूत सुविधांचा पुरता बोजवारा उडाला असतानाच व्यवस्थापनात सावळागोंधळ आहे. त्यामुळे काही पालकांनी फी भरण्यास नकार दिला आहे. आधी शाळेची अवस्था सुधारा आणि व्यवस्थापनातील गोंधळ दूर करा अशी मागणीही पालकांची आहे. त्यामुळे यातून तोडगा काढण्याऐवजी मुलांना जमिनीवर बसवले, शाळेत डांबून ठेवले. 'मुंबई लाइव्ह'ने शाळेच्या या मुजोरीचा पर्दाफाश करत हे प्रकरण उचलून धरले. या प्रकरणाची शिक्षण विभागाने दखल घेतली खरी, पण हे प्रकरण दाबण्याचाच प्रयत्न शिक्षण विभागाकडून होत असल्याचा पालकांचा आरोप आहे. त्यामुळेच अजूनही या शाळेविरोधात शिक्षण विभागाकडून कडक कारवाई झालेली नाही.

असं असलं तरी आता बालहक्क आयोगानं मात्र या प्रकरणाची गंभीर दखल घेत शाळेला दणका दिला आहे. दोन पालकांनी आयोगाकडे याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आयोगाने 10 दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांना दिले आहेत. त्यामुळे आता पालकांचे लक्ष या अहवालाकडेच लागले आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा