Advertisement

प्रॉक्सी बहाद्दरांना चाप, कॉलेजमध्ये होणार डिजिटल हजेरी!


प्रॉक्सी बहाद्दरांना चाप, कॉलेजमध्ये होणार डिजिटल हजेरी!
SHARES

प्रॉक्सी अटेंडन्स हा प्रकार कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी काही नवीन नाही. वर्गात शंभर-दीडशे मुलं, त्यामुळे प्रत्येक मुलावर लक्ष ठेवण्याची अपेक्षा प्राध्यापकांकडून करणं चूकच! त्यामुळे न आलेल्या किंवा लेक्चर बंक केलेल्या आपल्या मित्र किंवा मैत्रिणीचं नाव अटेंडन्ससाठी घेताच बिनधास्त त्याच्या नावाने 'येस सर' किंवा 'येस मॅडम' म्हणणारे प्रॉक्सी एक्स्पर्ट आपण बरेच बघितले असतील. किंबहुना आपल्यापैकीच अनेकांनी ही भूमिका अनेकदा आणि अगदी 'हुबेहूब' वठवली असेल! पण आता मात्र कॉलेज लाईफची ही ऐतिहासिक परंपरा बहुधा इतिहासजमा होणार आहे. कारण अशा प्रॉक्सी बहाद्दरांना चाप लावण्यासाठी कॉलेज प्रशासनानं कंबर कसली आहे.

मुंबईतल्या काही कॉलेजेसने अशा प्रॉक्सी बहाद्दरांना चाप लावण्यासाठी नामी शक्कल लढवली आहे. आणि यातून मार्ग काढून आपल्या मित्र किंवा मैत्रिणीसाठी प्रॉक्सी मारणं तुमच्यासाठी निव्वळ अशक्य होणार आहे. तुमची हजेरी आता फक्त आयडी कार्डवरच अवलंबून न रहाता ती डिजिटल झालीये. कशी ते पहायचंय? मग मुंबईतल्या या कॉलेजमध्ये जाऊन पहा!

मिठीबाई कॉलेज, विलेपार्ले

विलेपार्लेच्या मिठीबाई कॉलेजने Radio Frequency Identification System अर्थात रेडिओ लहरींच्या माध्यमातून अटेंडन्स घेण्याची प्रणाली बसवली आहे. त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला एक System Application Product(SAP) देण्यात येईल. हे एक प्रकारचं आयडी कार्डच असेल. हे कार्ड स्वाईप केल्यानंतरच तुमची हजेरी लावली जाणार आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांसोबतच प्रत्येक प्राध्यापक, प्राचार्य आणि कॉलेजमधल्या कर्मचाऱ्यांना हे कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे.

किशनचंद चेलाराम अर्थात केसी कॉलेज, चर्चगेट

फोन म्हणा की बँकेचे कार्ड, हल्ली प्रत्येक गोष्टीत 'स्मार्ट'पणा शोधणाऱ्या कॉलेजवयीन तरुणांना चर्चगेटच्या केसी कॉलेजने अटेंडन्ससाठीही 'स्मार्ट कार्ड' देण्याचा निर्णय घेतलाय. कॉ़लेजमध्ये प्रवेश घेताना आणि बाहेर पडताना हे कार्ड स्वाईप केल्याशिवाय तुमची हजेरी लागणारच नाही. मग वर्गात तुम्ही कितीही प्रॉक्झी अटेंडन्स द्या.


कॉलेजमध्ये सध्या 7 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे 'स्मार्ट कार्ड' सक्तीचे करण्यात आले आहेत. कॉलेजमध्ये 75 टक्के हजेरी सक्तीची असून या प्रणालीमुळे ती मोजणं सोपं होणार आहे.

- मंजुला श्रीनिवासन, प्राचार्य, केसी कॉलेज

नरसी मोनजी अर्थात एन. एम. कॉलेज, विलेपार्ले

हल्ली जवळपास प्रत्येक ऑफिसमध्ये बायोमेट्रिक अटेंडन्स सक्तीची करण्यात आली आहे. विलेपार्लेच्या नरसी मोनजी अर्थात एन एम कॉलेजनेही विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक प्रणाली राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जोपर्यंत संबंधित विद्यार्थ्यी स्वत: तिथे हजेरी लावत नाही, तोपर्यंत त्याची हजेरी नोंदवलीच जाणार नाही.


सध्या कॉलेजमध्ये रिडेव्हलपमेंटचं काम सुरु आहे. मात्र लवकरच कॉ़लेज नवीन इमारतीमध्ये शिफ्ट होईल. तिथे सर्व विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक अटेंडन्स सक्तीचे असेल.

- पराग अजगावकर, मुख्याध्यापक, एन. एम. कॉलेज

रुपारेल कॉलेज, माटुंगा

बायोमेट्रिक अटेंडन्स हा प्रकार बहुधा हजेरीसाठी सर्वात भरवशाचा प्रकार आहे. कारण एन. एम. कॉलेजसोबतच माटुंग्याच्या रुपारेल कॉलेजनेही अटेंडन्ससाठी बायेमेट्रिक यंत्रणा बसवली आहे. प्रारंभी कॉलेजमधल्या कोर्सेसला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठीच ही यंत्रणा सक्तीची असेल, मात्र पूर्णपणे यशस्वी ठरल्यावर संपूर्ण कॉलेजसाठी ही प्रणाली कार्यरत कऱण्यात येईल.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा