Advertisement

९वी व ११वीच्या विद्यार्थ्यांनाही पुढील वर्गात प्रवेश?

राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच इयत्ता नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही सरासरी गुण देऊन पुढील वर्गात प्रवेश द्यावा, अशी मागणी शिक्षक भारतीकडून करण्यात आली.

९वी व ११वीच्या विद्यार्थ्यांनाही पुढील वर्गात प्रवेश?
SHARES

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या शिक्षण विभागानं पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय असून, नववी व अकरावीच्या परीक्षेबाबतचा निर्णय १४ एप्रिलनंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं (सीबीएसई) ज्याप्रमाणे इयत्ता नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना वर्षभरातील सर्वंकष मूल्यमानाच्या गुणांच्या आधारे सरासरी गुण देऊन पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला, त्याप्रमाणे राज्य सरकारनंही निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. यानंतर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या आदेशानंतर देशातील बहुतांश शिक्षण मंडळांनी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. मात्र नववी व अकरावीच्या परीक्षेबाबत लॉकडाऊननंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं होतं. पण सीबीएसईनं बुधवारी याबाबत निर्णय जाहीर करत नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसरी गुण देऊन अनुक्रमे १०वी आणि १२वीत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. 

राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच इयत्ता नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही सरासरी गुण देऊन पुढील वर्गात प्रवेश द्यावा, अशी मागणी शिक्षक भारतीकडून करण्यात आली. सरकारनं लवकरात लवकर निर्णय घेऊन विद्यार्थी व पालकांना दिलासा द्यावा. जे विद्यार्थी सरासरी गुण देऊन नापास होतील, त्या विद्यार्थ्यांची परीक्षा जून महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच घेता येईल अशी सूचनाही करण्यात आली. 

याबाबतचा निर्णय लवकर झाल्यास १४ एप्रिल रोजी लॉकडाऊन संपल्यावर शिक्षकांना ३० एप्रिलपर्यंत निकाल लावता येऊ शकतो व नापास विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठीही वेळ मिळू शकतो. याबाबत सरकारने सीबीएसईप्रमाणे निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी पालक शिक्षक संघटनेकडून करण्यात आली आहे.



हेही वाचा -

Coronavirus Updates: धारावीत विलगीकरण अशक्य

मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन पेट परीक्षेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा