मुंबई विद्यापीठ - काॅमनवेल्थ ऑफ पेन्सिलव्हेनियामध्ये शैक्षणिक भागीदारी

या शैक्षणिक भागीदारीमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडीला अनुसरुन विशेष क्षेत्रांची निवड करण्यात आली अाहेत. त्यात नॅनो टेक्नॉलॉजी, डेटा सायन्स, आर्टीफिशिअल इंटेलिजेंस, कम्प्युटर सायन्स, बायोटेक्नोलॉजी, इंजिनीअरींग, फॉरेन्सिक सायन्स, सायबर डिफेन्स, जनरल सायन्स या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येणार आहे.

SHARE

मुंबई विद्यापीठाच्या संलग्नित कॉलेजातील विद्यार्थ्यांना अमेरिकेतील पेन्सिलव्हेनिया स्टेट येथील अनेक नामांकित उच्च शैक्षणिक संस्थामध्ये शिक्षण घेता यावं यासाठी मुंबई विद्यापीठाने महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. मुंबई विद्यापीठ आणि कॉमनवेल्थ ऑफ पेन्सिलव्हेनिया स्टेट सिस्टम ऑफ हायर एज्युकेशन या दोघांमध्ये शैक्षणिक भागीदारीसाठी इरादा पत्रावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या अाहेत. यामुळं विद्यार्थ्यांना पेन्सिलव्हेनियातील शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणं अधिक सोयीचं होणार आहे. सोमवारी १० डिसेंबर रोजी मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या या पत्रावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. 

 

विशेष क्षेत्रांची निवड 

या शैक्षणिक भागीदारीमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडीला अनुसरुन विशेष क्षेत्रांची निवड करण्यात आली अाहेत. त्यात नॅनो टेक्नॉलॉजी, डेटा सायन्स, आर्टीफिशिअल इंटेलिजेंस, कम्प्युटर सायन्स, बायोटेक्नोलॉजी, इंजिनीअरींग, फॉरेन्सिक सायन्स, सायबर डिफेन्स, जनरल सायन्स या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येणार आहे. त्याशिवाय अभ्यासक्रमांतील देवाण-घेवाण, अध्यापन पद्धती, फॅकल्टी ट्रेनिंग, करिकुलम मॅपिंग, समर स्टडी प्रोग्राम, ऑनलाईन सर्टिफिकेट प्रोग्राम, फिल्ड स्टडी प्रोग्राम आणि स्टुडंट्स एक्सचेंज प्रोग्राम इत्यादी उपक्रमही यानिमित्तानं हाती घेतले जाणार आहेत.  


शैक्षणिक नेतृत्वासाठी संधी 

त्यासोबत विद्यार्थ्यांसाठी काऊन्सिलिंग, नाव नोंदणीची सुविधाही उपलब्ध करण्यात येणार असून प्राध्यापकांनाही प्रशासकीय प्रशिक्षणाच्या सोयीबरोबरच शैक्षणिक नेतृत्वासाठी संधी उपलब्ध होणार आहे. तसंच मुंबई विद्यापीठात नव्यानं सुरु होत असलेल्या इक्युबेशन सेंटरसाठीही नॅनो सायन्स, बायोलॉजीकल सायन्स आणि फार्मासिट्युकल सायन्स या क्षेत्रातील सहकार्याच्या संधीनं नवीन उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.


मान्यवर उपस्थित

या कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू रविंद्र कुलकर्णी, कुलसचिव सुनिल भिरूड, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. सुरेश उकरंडे, सर जे.जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्राचार्य डॉ. राजीव मिश्रा आणि पेन्सिलव्हॅनिया स्टेटच्या राजदूत कनिका चौधरी, एक्झिक्युटिव्ह व्हाईस चान्सलर पीटर गारलँड यांच्यासह अनेक प्राध्यापक उपस्थित होते.


पेन्सिलव्हेनिया स्टेट सिस्टम ऑफ हायर एज्युकेशन हबमुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना अनेक नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षणाच्या संधीबरोबरच विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. तसंच मुंबई विद्यापीठ आणि कॉमनवेल्थ ऑफ पेन्सिलव्हेनिया यांच्यातील शैक्षणिक भागीदारीमुळे एका नव्या पर्वाचा प्रारंभ होत अाहे. 

- डॉ. सुहास पेडणेकर,  कुलगुरू,  मुंबई विद्यापीठ



हेही वेळी - 

मराठी अध्यापक संघाच्या त्रैमासिकाचं अनुदान पुन्हा सुरू




संबंधित विषय
ताज्या बातम्या