Advertisement

३२ पैकी ४ मागण्या मान्य, शिक्षकांचा पेपर तपासणीवर बहिष्कार कायम!

आमच्या एकूण ३२ मागण्या प्रलंबित आहेत. त्यातील केवळ ४ मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्यातही या संदर्भात आम्हाला अद्याप कोणतंही लेखी पत्र मिळालेले नसल्याची माहिती शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल देशमुख यांनी दिली.

३२ पैकी ४ मागण्या मान्य, शिक्षकांचा पेपर तपासणीवर बहिष्कार कायम!
SHARES

प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या पेपर तपासणीवर टाकलेला बहिष्कार कायम आहे. यामुळे आत्तापर्यंत राज्यात बारावीचे ६५ लाख पेपर तापसणीविना पडून आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या संघटनेच्या ४ मागण्या मान्य केल्या आहेत, अशी माहिती शालेय तसंच उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एका निवेदनाद्वारे दिली.


कुठल्या मागण्या मान्य?

  1. 'शालार्थ' प्रणालीमध्ये नावांचा समावेश करण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष कृती दलाची नियुक्ती
  2. ४२ दिवसांची संपकालीन रजा अर्जित रजा म्हणून मंजूर करण्यात येईल.
  3. एम.फील आणि पीएचडीधारक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना विविध चर्चासत्रांमध्ये संशोधन अहवाल वाचण्यासाठीच्या उपस्थितीसाठी वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकाप्रमाणे कार्यरजा मंजूर करण्यात येईल.
  4. २३ नोव्हेंबर २०१७ च्या शासन निर्णयाची अंमलबाजवणी पूर्वलक्षी प्रभावाने लागू केला जाणार नाही.

या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने आपले बहिष्कार आंदोलन मागे घ्यावे असं आवाहन विनोद तावडे यांनी केलं.


शिक्षक महासंघाचं काय म्हणणं?

या संदर्भात शिक्षक महासंघाला विचारणा केली असता आमच्या एकूण ३२ मागण्या प्रलंबित आहेत. त्यातील केवळ ४ मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्यातही या संदर्भात आम्हाला अद्याप कोणतंही लेखी पत्र मिळालेलं नाही, अशी माहिती शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल देशमुख यांनी दिली.

त्यामुळे जोपर्यंत आमच्या सगळ्या मागण्या सरकारकडून लेखी स्वरूपात मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने घेतला आहे.



हेही वाचा-

धक्कादायक! बारावीचे ६५ लाख पेपर तपासणीविना पडून!!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा