Advertisement

मुंबईत मिळणार आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचं शिक्षण


मुंबईत मिळणार आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचं शिक्षण
SHARES

आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या जोरावर मानवी जीवनात आमुलाग्र बदल घडले आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठात वाधवानी इन्स्टिट्यूट फॉर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ही संस्था स्थापन करणार आहे. त्यासाठी कॅलिफोर्नियास्थित वाधवानी इन्स्टिट्यूट आणि मुंबई विद्यापीठात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारासाठी मुंबई विद्यापीठाच्या संगणकशास्त्र विभागामार्फत पुढाकार घेण्यात आला.


लोकोपयोगी विकासात्मक संशोधनावर भर

या केंद्राच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील संशोधनावर, विशेषत: ग्रामीण, कृषी विकास, आरोग्य आणि शिक्षण अशा लोकोपयोगी विकासात्मक संशोधनावर भर देण्यात येणार आहे. या केंद्रामार्फत जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक सोयी-सुविधा आणि मार्गदर्शन पुरविण्यात येईल.


कराराचं स्वरूप कसं?

या सामंजस्य कराराचं स्वरुप सामाजिक समस्यांची उकल हे मूळ उद्दिष्ट्य ठेवून, फेलोशिप, संशोधन प्रकल्प, स्टुडेंट एक्चेंज प्रोग्राम, साईट व्हिजीट, अभ्यासक्रम निश्चिती, पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी लेक्चर्स असं आहे. अॅप्रेंटेशीप आणि रोजगार निर्मितीसाठी बँकिंग, वित्तीय संस्था आणि आयटी कंपन्यांची मदत घेतली जाणार आहे. अनेक विषयांतील होतकरू संशोधकांना जागतिक दर्जाच्या संशोधकांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम दर्जाचं संशोधन सादर करून आय पी आर, पेटंट्स मिळविण्यासाठी ही संधी असेल.


प्रगत अभयसक्रमांच्या निर्मितीचं ध्येय

मुंबई विद्यापीठाच्या संगणकशास्त्र विभागामार्फत हे केंद्र कार्यान्वित होणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून दिल्या जाणार्‍या विशेष पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांत प्रात्यक्षिक आणि प्रकल्पांचा समावेश असणार आहे. भारतातील आयआयटी, आयएसी सारख्या नामवंत संस्थांबरोबरच, स्टॅन्फर्ड, एमआयटी इ. जगभरातील नावाजलेल्या शास्त्रज्ञांचा अभ्यासक्रम आणि संशोधन प्रकल्प निर्माण करण्यात आणि राबविण्यात सहभाग असणार आहे.


५०० ते १ हजार संशोधक तयार होणार

संस्थेच्या माध्यमातून आणि मुंबई विद्यापीठाच्या संगणकशास्त्र विभागातून येत्या १० वर्षांत जवळपास ५०० ते १००० उत्तम दर्जाचे डेटा शास्त्रज्ञ तयार केले जातील. सामाजिक शास्त्रांसाठी डेटा-सायन्स या विषयांवर पायाभूत आणि प्रगत ऑनलाईन ओपन अभ्यासक्रमांची निर्मिती हे या केंद्राचे एक ध्येय असेल.


भविष्यात सामाजिक आव्हांनावर मात करुन सुकर जीवनशैली आणि मानवी जीवन सक्षम करण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची मोठी मदत होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन आणि मुंबई विद्यापीठामार्फत देशातील या पहिल्या केंद्राची स्थापना मुंबई विद्यापीठात होत आहेत, याचा विशेष आनंद होत आहे.

- डॉ. देवानंद शिंदे, प्रभारी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ



हेही वाचा-

'शिक्षकांनो, मोबाईल अॅपद्वारे माहिती गोळा करा', निवडणूक अधिकाऱ्यांचं फर्मान

शिक्षणमंत्री आणि ऊर्जामंत्री काढणार शाळांच्या वीजबिलावर तोडगा


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा