
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हणजेच एमपीएससीने परीक्षा पद्धतीत आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि ऐतिहासिक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
एमपीएससी आता वर्षातून 3 वेळा परीक्षा घेणार असून मुख्य परीक्षेतून वैकल्पिक विषयही पूर्णपणे वगळण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचा मानसिक ताण कमी करण्यासाठी आणि त्यांना अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयोगाने हा मोठा निर्णय घेतला आहे. हा नवा बदल सन 2027 पासून लागू होणार असून यामुळे स्पर्धा परीक्षेच्या विश्वात एक नवीन पर्व सुरू होणार आहे.
कसा असणार परीक्षांचा नवा पॅटर्न?
सध्याच्या पद्धतीनुसार एमपीएससीच्या पूर्व परीक्षा वर्षातून केवळ एकदाच घेतल्या जातात. यामुळे वर्षभर अभ्यास करूनही एकाच दिवशी परीक्षा खराब झाली. तर विद्यार्थ्यांचे पूर्ण वर्ष वाया जायचे आणि त्यांच्यावर प्रचंड मानसिक दडपण यायचे.
आता हा ताण दूर करण्यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या तिन्ही परीक्षा वर्षातून दोन किंवा अधिक वेळा म्हणजेच तब्बल 3 वेळा घेतल्या जाणार आहेत.
विद्यार्थ्यांचे भवितव्य आता केवळ एका दिवसाच्या परीक्षेवर अवलंबून राहणार नाही, तर त्यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी एकाच वर्षात अनेक संधी मिळणार आहेत.
मुख्य परीक्षेतून वैकल्पिक विषय बाद
या संपूर्ण बदलांमधील दुसरा सर्वात मोठा निर्णय म्हणजे राज्य सेवा मुख्य परीक्षेतून वैकल्पिक विषय पूर्णपणे वगळण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता उमेदवारांना वैकल्पिक विषयांचे 2 पेपर द्यावे लागणार नाहीत. बऱ्याच काळापासून विद्यार्थी या विषयांबद्दल मागणी करत होते.
या निर्णयामुळे आता सर्व विद्यार्थ्यांना समान पातळीवर स्पर्धा करता येणार असून, वैकल्पिक विषयांची निवड करण्याची आणि त्यामध्ये मिळणाऱ्या मार्कांच्या फरकाची चिंता आता संपणार आहे.
ओएमआर शीट बंद आता होणार ऑनलाईन परीक्षा
एमपीएससीने केवळ परीक्षांची संख्याच वाढवली नाही, तर संपूर्ण प्रक्रियेचा कायापालट केला आहे. आतापर्यंत होणारी पारंपारिक ओएमआर शीटवरील (पेपर-पेन) परीक्षा पद्धत आता बंद होणार आहे. त्याऐवजी आता संगणकावर आधारित ऑनलाईन परीक्षा म्हणजेच सीबीटी (Computer Based Test) घेतली जाणार आहे.
परीक्षा ऑनलाईन होणार असल्यामुळे संपूर्ण प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येईल आणि परीक्षांचे निकालही अत्यंत गतीने जाहीर करणे आयोगाला शक्य होणार आहे.
नॉर्मलायझेशन पद्धत आणि मुख्य परीक्षेचा नियम
परीक्षा वर्षातून 3 वेळा आणि वेगवेगळ्या सत्रांमध्ये घेतली जाणार आहे. सर्व विद्यार्थ्यांचे मूल्यमापन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी आयोगाने गुणांचे समानीकरण म्हणजेच नॉर्मलायझेशन पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या नवीन नियमानुसार, वर्षातून दोन किंवा अधिक वेळा होणाऱ्या पूर्व परीक्षांपैकी कोणत्याही एका पूर्व परीक्षेत जे उमेदवार पात्र ठरतील, ते सर्व उमेदवार त्या वर्षाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र मानले जातील.
पूर्व परीक्षा जरी वर्षातून 3 वेळा होणार असली, तरी मुख्य परीक्षा मात्र वर्षातून केवळ एकदाच घेतली जाईल, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
2027 पासून नवीन निर्णय लागू
एमपीएससीच्या परीक्षा नियंत्रक व सहसचिव सरिता बांदेकर-देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण नवीन आणि सुधारित कार्यपद्धती 2027 मध्ये होणाऱ्या पूर्व परीक्षांपासून पूर्णपणे लागू केली जाईल. या दोन्ही किंवा अधिक पूर्व परीक्षांमधून उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी नेमके कसे पात्र ठरवले जाईल, याच्या सविस्तर कार्यपद्धतीबाबत आयोग लवकरच एक स्वतंत्र प्रसिद्धीपत्रक काढून माहिती देणार आहे.
हेही वाचा
