Advertisement

दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी एसएससी (इ. १० वी) आणि एचएससी (इ. १२ वी) परीक्षांच्या तारखांची घोषणा केली आहे.

दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
SHARES

राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा कधी जाहीर होतील? याकडे लक्ष लागून असलेल्या विद्यार्थी-पालकांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी परीक्षा घेण्यास हिरवा कंदील दाखवल्यानंतर शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी एसएससी (इ. १० वी) आणि एचएससी (इ. १२ वी) परीक्षांच्या तारखांची घोषणा गुरूवार २१ जानेवारी २०२१ रोजी केली आहे.

वर्षा गायकवाड (varsha gaikwad) यांनी दिलेल्या माहितीनुसार एसएससी (इ. १० वी) बोर्डाची परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे २०२१ या कालावधीत घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. दहावी परीक्षेचा निकाल ऑगस्ट २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. 

तर, एचएससी (इ. १२ वी) बोर्डाची परीक्षा येत्या २३ एप्रिल ते २९ मे २०२१ दरम्यान घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या परीक्षेचा निकाल अंदाजे जुलै २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात येईल, असं देखील वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा- महिनाअखेरीस महाविद्यालये होणार सुरू?

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (सीबीएसई)च्या परीक्षांच्या तारखा ३१ डिसेंबर रोजी जाहीर केल्या होत्या. त्यानुसार सीबीएसईची दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा १ मार्चपासून आणि लेखी परीक्षा ४ मे २०२१ पासून सुरू होणार असून त्या १० जूनपर्यंत चालणार आहेत. परीक्षांनंतर १५ जुलैपर्यंत निकाल जाहीर करण्यात येणार आहे. 

तेव्हापासून राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षा कधी होणार याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं होतं. परीक्षांच्या तारखांची घोषणा करतानाच बारावीच्या परीक्षांचे निकाल जुलै महिना संपण्याआधी आणि दहावीचे निकाल ऑगस्ट महिना संपण्याआधी लावले जातील, असं आश्वासनही वर्षा गायकवाड यांनी दिलं आहे.

सध्या मुंबई, ठाणे वगळून राज्यातील (maharashtra) बहुतेक ठिकाणी नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. कोरोना (coronavirus) प्रादुर्भावाची स्थिती लक्षात घेऊन आणि सार्वजनिक आरोग्य विभागाशी चर्चा करून स्थानिक पातळीवर पाचवी ते आठवीपर्यंत शाळा सुरू करण्याचे निर्देश देखील शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. तर दहावी-बारावीचे बहुसंख्य विद्यार्थी हे आॅनलाईन अभ्यासावर लक्ष केंद्रीत करून परीक्षेची तयारी करत आहेत. 

(maharashtra school education minister varsha gaikwad declared ssc and hsc board exams)

हेही वाचा- आरटीई प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा