Advertisement

मराठी, गुजरातीचे शिक्षक देणार इंग्रजीचे धडे


मराठी, गुजरातीचे शिक्षक देणार इंग्रजीचे धडे
SHARES

मुंबई महापालिकेच्या मराठी व गुजराती माध्यमाच्या शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांना प्रशिक्षण देऊन त्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत समायोजन करण्याचे आदेश नुकतेच पालिकेच्या शिक्षण विभागाने दिले. मुंबईसह इतर परिसरातील मराठी आणि गुजराती माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होत असल्यानं या शाळांमधील शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. त्यामुळेच पालिकेच्या शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.


इंग्रजी माध्यमांसाठी शिक्षकच नाहीच

सध्या मराठी तसेच गुजराती माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षकांची संख्या जास्त आहे. मात्र इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी शिक्षकच मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच मराठी व गुजराती शाळेतील अतिरिक्त शिक्षकांना इंग्रजी शाळांमध्ये सामाविष्ट करण्याचा निर्णय पालिकेच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. सध्या मराठी व गुजराती माध्यमातील शाळांमध्ये जवळपास शंभर ते सव्वाशे शिक्षक अतिरिक्त आहेत. त्याचप्रमाणे इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये सुमारे तीनशे शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत.


असं होईल समायोजन

गेल्या पाच वर्षापासून सर्व शिक्षकांना ब्रिटिश कौन्सिलतर्फे इंग्रजी भाषा व इंग्रजी संभाषणाचं प्रशिक्षण दिलं जाते. जवळपास ४० दिवसांच्या या प्रशिक्षणानंतर सर्व शिक्षक इंग्रजी भाषा चांगल्याप्रकारे लिहायला, वाचायला व बोलायला लागले आहेत. ज्या शिक्षकांना चांगले इंग्रजी येते व त्यांची इंग्रजी शाळांमधील विद्यार्थ्यांना शिकवण्याची इच्छा आहे, अशा शिक्षकांचं इंग्रजी माध्यमात समायोजन करण्यात येणार आहे. सध्या या शिक्षकांचं पहिली ते पाचवीच्या वर्गांसाठी इंग्रजीचं प्रशिक्षण देण्याचं काम सुरू आहे. हे प्रशिक्षण संपल्यानंतर पालिकेच्या जवळपास ६३ शाळांमध्ये या शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे.

शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या आणि पूर्ण वेतन घेणाऱ्या शिक्षकांना काम मिळावं म्हणून हा निर्णय घेण्यात आला अाहे. ज्या शिक्षकांना आपण इंग्रजी माध्यमात शिकवू शकतो, अशाच शिक्षकांचं इंग्रजी शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे.
- महेश पालकर, शिक्षणाधिकारी


हेही वाचा -

शारदाश्रमच्या 'इंटरनॅशनल' शाळेला परवानगीच नाही!

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा