शिक्षक, शिक्षकेतरांची हालापेष्टा सुरूच, लाखो रुपयांची वैद्यकीय बिलं थकली


SHARE

मुंबईतील उत्तर, दक्षिण व पश्चिम विभागातील शिक्षक, शिक्षकेतरांची वैद्यकीय खर्चांची लाखो रुपयांची बिले शिक्षण विभाग आणि अधिदान व लेखाधिकारी कार्यालयाच्या लालफितीच्या कारभारात अडकली आहेत. वर्षभरापासून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या बिलांसाठी वारंवार शिक्षण विभागात चकरा मारत आहेत. मात्र अधिदान व लेखाधिकारी कार्यालयाकडून (salary & account department) तांत्रिक त्रुटी काढून ही बिलं शिक्षण विभागात परत पाठवली जात आहेत. कर्ज काढून केलेल्या उपचाराचा खर्च वेळेवर न मिळाल्याने शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.


आर्थिक व मानसिक ताण

काही शिक्षकांना वैद्यकीय बिलाची रक्कम वेळेत न मिळाल्याने पुढील उपचार घेता आलेले नाहीत. चेंबूरच्या एका शिक्षकाला दोन वर्षांपूर्वी अर्धांगवायू झाल्यामुळे लाखो रुपये खर्च आला होता. पुढील उपचार घेण्यासाठी वैद्यकीय बिलाच्या रकमेची ते वाट पाहत आहेत. शिक्षण विभाग व अधिदान लेखाधिकारी कार्यालय यांच्याकडून बिलं अदा करण्यासाठी होण्याऱ्या विलंबामुळे अशा अनेक शिक्षकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. एका हार्ट अटॅकचे पैसे सरकारकडून मिळण्याअगोदर दुसरा अटॅक येतो की काय? अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली.


आंदोलनाचा इशारा

वैद्यकीय बिलांसोबत थकीत वेतन आणि इतर पुरवणी बिलांची रक्कमही मिळालेली नाही. काही शिक्षकांची पाच-पाच महिन्यांच्या पगारांची बिलं थकलेली आहेत. त्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. लवकरात लवकर बिलं न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे यांनी दिला आहे.


दरवर्षी शिक्षक दिनाला शिक्षणमंत्री विनोद तावडे कॅशलेस योजनेची घोषणा करतात. परंतू ही योजना प्रत्यक्षात लागू करत नाहीत. यावेळी पुन्हा एकदा नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात शिक्षणमंत्र्यांनी १ एप्रिलपासून 'सावित्री फातिमा शिक्षक कुटुंब आरोग्य योजना' लागू करण्याचं जाहीर केलं आहे. मात्र ही घोषणाही एप्रिल फूल ठरु नये, ही विनंती.
- कपिल पाटील, शिक्षक आमदारहेही वाचा-

५ टक्के शैक्षणिक निधीचं ओझं मानगुटीवर कशाला? खासगी क्लास चालकांचा सरकारी मसुद्याला विरोध

तावडे म्हणतात, शाळा बंद नव्हे, स्थलांतरीत करणार!


संबंधित विषय
ताज्या बातम्या