Advertisement

MPSC परीक्षा पुन्हा पुढे ढकलली, ‘ही’ आहे नवी तारीख

महाराष्ट्र लोकलसेवा आयोगाकडून (MPSC) १३ सप्टेंबरला घेण्यात येणारी राज्यसेवा परीक्षा तिसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे.

MPSC परीक्षा पुन्हा पुढे ढकलली, ‘ही’ आहे नवी तारीख
SHARES

महाराष्ट्र लोकलसेवा आयोगाकडून (MPSC) १३ सप्टेंबरला घेण्यात येणारी राज्यसेवा परीक्षा तिसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. देशभरात १३ सप्टेंबर रोजी नीट परीक्षा होणार असल्याने राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलून २० सप्टेंबरला घेण्याचं ठरवण्यात आलं आहे. एमपीएसीने अधिकृत पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. (mpsc exam postponed third time for nationwide neet exam)

एमपीएससीने २३ डिसेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहीरातीनुसार, राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० रविवार, ५ एप्रिल २०२० रोजी घेण्याचं निश्चित केलं होतं. परंतु कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर राज्यसेवा परीक्षांचं सुधारित वेळापत्रक १७ जून रोजी जाहीर करण्यात आलं. या वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार होत्या. 

हेही वाचा - एमपीएससी परीक्षांचं नवं वेळापत्रक जाहीर

मात्र, राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून ३ जुलै २०२० रोजीच्या सूचनेद्वारे राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) १३ सप्टेंबर २०२० रोजी घेण्याचं निश्चित करण्यात आल्याने एमपीएससीने पुन्हा एकदा ही परीक्षा पुढे ढकलण्याचं ठरवलं आहे.

एकाच दिवशी दोन्ही परीक्षा घ्यायचं झाल्यास विद्यार्थ्यांची संख्या पाहता परीक्षा उपकेंद्राच्या उपलब्धतेसह अन्य प्रशासकीय अडचणी निर्माण होत असल्याची बाब एमपीएससीने निदर्शनास आणली. राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून घेण्यात येणारी परीक्षा ही देश पातळीवर घेण्यात येणार आहे, ही बाब लक्षात घेऊन प्रशासकीय कारणामुळे एमपीएससीने राज्य सेवा पूर्व परीक्षा २० सप्टेंबर रोजी घेण्याचं निश्चित केल्याचं एमपीएससीने प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

उमेदवार व परीक्षा आयोजनातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आयोगाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचंही एमपीएसीने स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा - 'एमपीएससी'च्या परीक्षा स्थगित करा

संबंधित विषय
Advertisement