Advertisement

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची 'वटवावटवी'!


मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची 'वटवावटवी'!
SHARES

परीक्षांचे निकाल वेळेवर न लागल्यामुळे टीकेचे धनी ठरलेले मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख विद्यापीठाच्या नावे असलेल्या मुदतठेवी मुदतीपूर्वीच तोडल्यावरुन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

मुंबई विद्यापीठाला सध्या प्रचंड आर्थिक चणचण भासत आहे. विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या पगारापासून दैनंदिन खर्च भागवणेही विद्यापीठ प्रशासनाला सध्या कठीण झाले आहे. ही आर्थिक अडचण सोडवण्यासाठी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी मागील 22 महिन्यांमध्ये विद्यापीठाच्या नावे विविध बँकांमध्ये ठेवण्यात आलेल्या 111 कोटी रुपयांच्या मुदतठेवी मुदतीपूर्वीच वटविल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे.

यापूर्वी मुंबई विद्यापीठाचे निकाल जाहीर होण्यास उशीर झाल्याची दखल घेत महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती सी. विद्यासागर राव यांनी देशमुख यांना 31 जुलैपर्यंत सर्व प्रलंबित निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले होते.


माहिती अधिकाराखाली बाब उघड

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई विद्यापीठाच्या विविध बँकेतील ठेवी, तसेच मुदतीपूर्वीच तोडलेल्या ठेवींची माहिती विचारली होती. त्यानुसार मुंबई विद्यापीठाच्या वित्त आणि लेखा विभागाने अनिल गलगली यांना 1 जुलै 2015 पासून 31 मे 2017 पर्यंतच्या ठेवींची माहिती दिली.

या माहितीनुसार, विविध बँकेतील 100 ठेवी मुदतीपूर्वीच तोडत मुंबई विद्यापीठाने मिळालेला पैसा वापरला आहे. 20 नोव्हेंबर 2015 पासून 28 एप्रिल 2017 या कालावधीत 110 कोटी 87 लाख 90 हजार 661 रुपयांच्या ठेवी मुदतीपूर्वीच तोडल्याने मुंबई विद्यापीठाला त्यातून 3 कोटी 55 लाख 6 हजार 656 रुपये इतके व्याज मिळाले आहे. मुदतठेवींचा कालावधी पूर्ण झाला असता, तर याच रकमेतून विद्यापीठाला चार पट व्याज मिळाले असते.


1 कोटींहून जास्त रक्कम 11 वेळा काढली

1 सप्टेंबरला 6 कोटी 64 लाख 75 हजार रुपये बँक ऑफ बडोदामधून वटवण्यात आले. त्यावर 14 लाख 73 हजार 211 रुपयांचे व्याज मिळाले. ज्या बॅंकांमधून 100 ठेवी मुदतीपूर्वीच वटविण्यात आल्या, त्या सर्व ठेवी 1 वर्षे मुदतीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. तसेच 29 सप्टेंबर 2016 रोजी 17 ठेवी वटविण्यात आल्या.



मी राज्यपालांना पत्र पाठवून ताबडतोब कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. निकाल वेळेत घोषित न करणारे डॉ देशमुख आता ठेवींच्या व्याजावर बोळा फिरवित आहे. अर्थसंकल्पाचे आकडे फुगवून चुकीचे नियोजन केल्यामुळे मुंबई विद्यापीठाची अवस्था दारुण झाली आहे. लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य ज्या विद्यापीठाच्या हाती आहे, त्या विद्यापीठाची आर्थिक बाजू खिळखिळी करणाऱ्या सर्व जबाबदार अधिकाऱ्यांची निवृत्त न्यायाधिशामार्फत चौकशी करण्याचीही मागणी केली आहे.


- अनिल गलगली, माहिती अधिकार कार्यकर्ते


कुलगुरुंकडे अधिकार

मुंबई विद्यापीठाच्या खात्यावर विविध निधींच्या माध्यमातून 518 कोटींच्या ठेवी विविध बँकांत जमा होत्या. दि. महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज अकाऊंट्स कोड 1.72 नुसार ठेवी आणि गुंतवणुकीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार कुलगुरुंकडे आहेत.


मुंबई विद्यापीठ अर्थिक नियोजन करताना बँकेत मुदतठेवी ठेवते. विद्यापीठाला जेव्हा आर्थिक चणचण भासते, तेव्हा या मुदतठेवी वटवल्या जातात. आम्हाला सरकारकडून 1 हजार कर्मचाऱ्यांसाठी 75 टक्के रक्कम आगाऊ मिळते. विद्यापीठातील 2500 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या पगारावर विद्यापीठाचे 7 कोटी खर्च होतात. त्याचप्रमाणे नवीन वाचनालय, हॉस्टेल, तराले मॉडेल कॉलेज इमारत, न्यू एक्झॅमिनेशन बिल्डींग, नरिमन पॉईंट येथील मुलींचे वसतीगृह अशा अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये विद्यापीठाचा पैसा खर्च होतो.


- एम. ए. खान, रजिस्ट्रार, मुंबई विद्यापीठ




हे देखील वाचा -

नो टेन्शन! एफवायच्या अतिरिक्त तुकड्यांना मंजुरी


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा