Advertisement

उत्तरपत्रिका एकाची, फोटाेकाॅपी दुसऱ्याची, मुंबई विद्यापीठाचा नवा घोळ

विद्यापीठात अनेक घिरट्या मारल्यानंतर एका विद्यार्थ्याला उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी मिळाली. मात्र ही फोटोकॉपी बघून त्याची पुन्हा एकदा निराशा झाली. त्याला त्याची नव्हे, तर दुसऱ्या विद्यार्थ्याची फोटोकॉपी देण्यात आली.

उत्तरपत्रिका एकाची, फोटाेकाॅपी दुसऱ्याची, मुंबई विद्यापीठाचा नवा घोळ
SHARES

मुंबई विद्यापीठातील निकालाचा गोंधळ संपता संपत नाहीय. दररोज नवनवीन गोंधळ समोर येत आहे. मात्र या सगळ्या गोंधळात विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. आपली उत्तरपत्रिका नक्की तपासली आहे का? उत्तरपत्रिका गहाळ तर झाली नाही ना? असे अनेक प्रश्न सध्या विद्यार्थ्यांना भेडसावत आहेत. अशीच एक गोष्ट घडलीय निरंजन मजीठिया काॅलेजच्या एका विद्यार्थ्यासोबत.


मुंबई विद्यापीठाचा दररोज नवीन गोंधळ 

निरंजन मजीठिया कॉलेजचा विद्यार्थी संदेश इंगवले याने मुंबई विद्यापीठातून बीएससीची तिसऱ्या वर्षाची परीक्षा दिली. त्याचा निकालही लागला. मात्र दोन विषयांत विद्यापीठाने ८ गुण देऊन त्याला अनुत्तीर्ण केलं. गेले ३ वर्ष कॉलेजमध्ये टॉपर असणाऱ्या संदेशला हा निकाल पाहून धक्काच बसला. त्याने विद्यापीठात धाव घेतली. विद्यापीठात पुर्नमूल्यांकनासाठी अर्जही केला. आपण नापास होणार नाही ही खात्री त्याला होती. त्यामुळे त्याने विद्यापीठाकडे फोटो कॉपीसाठीही अर्ज केला. 


आसनक्रमांकही वेगवेगळा

विद्यापीठात अनेक घिरट्या मारल्यानंतर अखेर त्याला उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी मिळाली. मात्र ही फोटोकॉपी बघून त्याची पुन्हा एकदा निराशा झाली. त्याला त्याची नव्हे, तर दुसऱ्या विद्यार्थ्याची फोटोकॉपी देण्यात आली. त्याच्या उत्तरपत्रिकेवरील आणि फोटोकॉपीच्या उत्तरपत्रिकेमधील आसनक्रमांकही वेगवेगळा होता. त्यामुळे स्वत:च्या फोटोकॉपीसाठी संदेशच्या पुन्हा विद्यापीठात वाऱ्या सुरू झाल्या.
इतर विषयात चांगले गुण आणि दोन विषयांत ८ गुण हे न पटण्यासारखं आहे. त्यामुळे मी या दोन उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी विद्यापीठाकडे मागितली. तेव्हा माझी उत्तरपत्रिकाच तपासली नसल्याचं दिसलं. नंतर लक्षात आलं की ती उत्तरपत्रिकाच माझी नाहीय. गेले आठवडाभर मी याचा पाठपुरावा करत आहे. मात्र विद्यापीठ कायमच उडवाउडवीची उत्तरे देत आहे. अखेर मला आज माझा निकाल मिळाला मला ४२ गुण विद्यापीठाने दिले आहेत. हे गुणही कमीच आहेत. मात्र आता पुन्हा या गोष्टीत वेळ घालवला, तर पुढील अभ्यासक्रमाला वेळ मिळणार नाही. आता पास झालो, एवढंच काय ते समाधान. 

- संदेश इंगवले, विद्यार्थी, निरंजन मजीठिया काॅलेज


हेही वाचा-

'एटीकेटी'वरून मुंबई विद्यापीठात 'खडाजंगी'


संबंधित विषय