Advertisement

विद्यापीठाचे निकाल अजूनही रखडलेलेच

मुंबई विद्यापीठाचे पदव्युत्तर पदवी, लॉ आणि आयडॉलच्या विद्यार्थ्यांचे जवळपास २६१ अभ्यासक्रमांचे निकाल अद्याप रखडलेले आहेत. सोमवारी सकाळपर्यंत विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन विभागानं २२९ परीक्षांचे निकाल जाहीर केलं असून, सध्या उर्वरीत निकालांकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे.

विद्यापीठाचे निकाल अजूनही रखडलेलेच
SHARES

मुंबई विद्यापीठाचे सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेल्या मोठ्या अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले असले, तरी पदव्युत्तर पदवी, लॉ आणि आयडॉलच्या विद्यार्थ्यांचे जवळपास २६१ अभ्यासक्रमांचे निकाल अद्याप रखडलेले आहेत. सोमवारी सकाळपर्यंत विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन विभागानं २२९ परीक्षांचे निकाल जाहीर केलं असून, सध्या उर्वरीत निकालांकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे.


यंदाही निकाल रखडलेले

मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनासाठी ऑनलाइन मूल्यांकन पद्धत सुरू केली. सरसकट सर्व शाखांच्या उत्तरपत्रिकांसाठी हीच पद्धत अवलंबल्यानं त्यातील काही त्रुटींचा फटका गेल्या वर्षी लाखो विद्यार्थ्यांना बसला होता, त्यातून कोणताही धडा न घेता यंदाही विद्यापीठने ऑनलाइन असेसमेंटच्या माध्यमातूनच उत्तरपत्रिकांच्या तपासणीचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे अनेक निकाल रखडल्याचं स्पष्ट होत आहे.

रखडलेल्या निकालात प्रामुख्याने लॉ शाखेच्या विद्यार्थ्यांचा समावेश असून विद्यापीठाने नुकतंच बीए, बीकॉम आणि बीएससीसारख्या महत्त्वपूर्ण निकालांची घोषणा केली आहे. असं असलं तरीही विद्यापीठातील विविध २६१ अभ्यासक्रमांचे निकाल अजूनही रखडलेलेच आहेत.


इतक्या उत्तरपत्रिकांचा समावेश

परीक्षा आणि मूल्यमापन विभागानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार यंदा विद्यापीठानं एकूण ४९० परीक्षा घेतल्या आहेत. त्यात आर्टस् शाखेच्या ४५, कॉमर्स अ‍ँड मॅनेजमेंट शाखेचे ९५, सायन्स अँड टेक्नोलॉजीचे २१९ आणि इंट्राडिसिप्लिनरी स्टडिजच्या १३१ परीक्षांचा समावेश आहे. यामध्ये सर्व अभ्यासक्रमांच्या १६ लाख ६२ हजार उत्तरपत्रिकांचा समावेश आहे


ऑगस्टचा दुसरा आठवडा उजाडणार

विद्यापीठाच्या दूर आणि मुक्त शिक्षण संस्थेतून (आयडॉल) विविध अभ्यासक्रमांची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल अद्याप जाहीर करण्यात आले नाहीत. या अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका तपासणीचं काम पूर्ण झालेलं नसून, निकाल जाहीर होण्यास ऑगस्टचा दुसरा आठवडा उजाडण्याची शक्‍यता आहे. यंदा आयडॉलमधून बीएच्या तृतीय वर्षासाठी सहा हजार तर बीकॉमसाठी सुमारे नऊ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.

आतापर्यंत जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या अभ्यासक्रमांचा निकाल जाहीर झाले आहेत. ज्या परीक्षांचे निकाल बाकी आहेत, त्या परीक्षा मे अखेरीस अथवा जूनमध्ये संपलेल्या आहेत. त्याच्या मूल्यांकनाचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून, लवकरच निकाल जाहीर केले जातील.      - विनोद मळाले, उपकुलसचिव, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, जनसंपर्क विभाग

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा