Advertisement

विद्यापीठाचा बृहत् आराखडा ठरवणार विद्यार्थी

येत्या कालावधीत विद्यापीठाचा विकास नेमका कसा व्हावा, विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचं शिक्षण देण्यात येईल, कशाप्रकारचे नवे अभ्यासक्रम सुरू होतील, कौशल्य विकासासाठी काय पावलं उचलली जातील? या विविध बाबींचा बृहत् आराखड्यात समावेश करण्यात येईल.

विद्यापीठाचा बृहत् आराखडा ठरवणार विद्यार्थी
SHARES

मुंबई विद्यापीठाचा पंचवार्षिक आराखडा प्रशासन नव्हे तर आता समाज ठरवणार आहे. यात विद्यार्थी-विद्यापीठाच्या भवितव्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, पालक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, विविध विषयातील तज्ज्ञ, शासकीय अधिकारी आणि स्थानिक प्रतिनिधीही आपली मतं नोंदवू शकणार आहेत. नुकतीच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी याबाबतची घोषणा केली आहे.


बृहत् आराखडा म्हणजे काय?

येत्या कालावधीत विद्यापीठाचा विकास नेमका कसा व्हावा, विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचं शिक्षण देण्यात येईल, कशाप्रकारचे नवे अभ्यासक्रम सुरू होतील, कौशल्य विकासासाठी काय पावलं उचलली जातील? या विविध बाबींचा बृहत् आराखड्यात समावेश करण्यात येतो.

त्यासोबतच उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेचा स्तर उंचावणे, रोजगारासाठी प्रयत्न करणे, यांसारख्या अनेक बाबींना डोळ्यासमोर ठेवून विविध तज्ज्ञ, विद्यार्थी आणि सर्व सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया मागवून बृहत आराखडा तयार करण्यात येतो. या आराखड्याचा सर्वसमावेशक विकास, असा उद्देश असून ही योजना दीर्घ कालावधीकरता तयार करण्यात येते.


यासाठी कार्याशाळेचं आयोजन

मुंबई विद्यापीठाच्या २०१९-२० ते २०२३-२४ असा पंचवार्षिक बृहत् आराखडा तयार करण्यात येईल. या पार्श्वभूमीवर दीक्षांत सभागृहात कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं.


काय म्हणाले कुलगुरू?

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर म्हणाले 'शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे विद्यापीठाचा बृहत् आराखडा तयार करताना त्यांच्यासह समाजाचा समावेश करणे गरजेचं आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर शिक्षण क्षेत्रात होणारे आमुलाग्र बदल आणि त्यात काही सुधारणा होणे गरजेचं आहे. त्यामुळे कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम तयार करून रोजगाराभिमुख शिक्षण देण्यासाठी हा पंचवार्षिक बृहत् आराखडा तयार करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांचा समावेश करून घेण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात येणार आहे'.


कार्यशाळेला यांची उपस्थिती

या कार्यशाळेला एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी, प्र-कुलगुरू डॉ. विष्णू मगरे, कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे यांच्यासह उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने, शिक्षणतज्ज्ञ आनंद मापूसकर, प्रा. मिलिंद सोहनी, डॉ.बी.एन. जगताप आणि विविध विद्याशाखेच्या अधिष्ठातांसह प्राचार्य आणि शिक्षक उपस्थित होते.


अशी होणार प्रक्रिया…

विकास आराखड्यासाठी विद्यापीठाकडून पहिल्यांदाच समाजातील विविध घटकांकडून सूचना मागवल्या जाणार आहेत. यासाठी विद्यापीठामार्फत लवकरच ऑनलाईन सर्वेक्षण केलं जाणार आहे. हे सर्वेक्षण प्रश्नावलीच्या स्वरुपात असेल. ही सर्वेक्षण प्रश्नावली विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार असून या प्रक्रियेसाठी विद्यापीठाने एक समितीही स्थापन केली आहे.

महाराष्ट्र राज्यात उच्च शिक्षण क्षेत्राचा विस्तार होत आहे, महाराष्ट्रासारख्या शिक्षण क्षेत्रात अग्रक्रमी असणाऱ्या उच्च शिक्षणाचे दीर्घकालीन धोरण ठरवण्यासाठी राज्य शासनाने शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीच्या शिफारशीनुसार विद्यापीठांचे बृहत आराखडे तयार केले जात आहेत.

शिक्षण क्षेत्राकडून समाजाच्य अपेक्षा पूर्वीपेक्षा वाढल्यामुळे शिक्षण समाजभिमूख होणे गरजेचे आहे. तसेच त्या दृष्टिकोनातून विद्यापीठाने मार्गक्रमन करीत शिक्षणाला कौशल्याची जोड देण्यासाठी कौशल्याधारीत शिक्षण, महिला सक्षमीकरण, संशोधनाचा दर्जा, उपकेंद्रांचे सक्षमीकरण, दर्जात्मक सुधारणा, प्रवेश क्षमता, रिक्त जागा, दोन महाविद्यालयांतील अंतर अशा विविध पैलूंवर प्रकाश टाकला पाहिजे.
- आनंद मापूसकर, राज्य शासनाचे प्रतिनिधी व शिक्षणतज्ज्ञ


हेही वाचा -

विद्यापीठात रखडलेलं संशोधन केंद्र लवकरच उभारणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा