लेखी गुणांवरच मिळणार ११ वीला प्रवेश?

१वी प्रवेश प्रक्रियेत सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचे केवळ लेखी परीक्षेचे गुण ग्राह्य धरण्याचा विचार सरकार करत असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.

लेखी गुणांवरच मिळणार ११ वीला प्रवेश?
SHARES

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या  दहावी (SSC) परीक्षेचा निकाल ७७.१० टक्के लागला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल १२ टक्क्यांनी घसरला आहे. यावर काही दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी 'तोंडी परीक्षेचे गुण कमी केल्यानं दहावीच्या निकालाचा टक्का घसरला’, अशी प्रतिक्रीया दिली होती. त्यांच्या प्रतिक्रियेनंतर ११वी प्रवेश प्रक्रियेत सीबीएसईचे विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मागे टाकून नामांकीत महाविद्यालयातील जागा पटकावतील, अशी भीती विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना सतावत होती. त्यावर तोडगा काढण्यासाठी ११वी प्रवेश प्रक्रियेत सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचे केवळ लेखी परीक्षेचे गुण ग्राह्य धरण्याचा विचार सरकार करत असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.

भवितव्य अंधारात

सीबीएसई, आयसीएसई, आयबी इ. मंडळाशी संलग्न शाळांतले विद्यार्थी अंतर्गत मूल्यमापनामधून मिळालेले ९० टक्क्यांहून अधिक भरभक्कम गुण घेऊन येतात आणि अकरावी प्रवेशात राज्य मंडळाच्या शाळांतील विद्यार्थ्यांना मागे टाकतात ही दरवर्षाची स्थिती झाली आहे. 

अशातच राज्य सरकारने दहावीच्या विद्यार्थ्यांचे तोंडी परीक्षेचे गुण कमी केल्याने  जवळपास ४ लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात गेल्याची भावना पालकांमध्ये तयार झाली. यामुळे नामांकित महाविद्यालयांमध्ये राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही. एकप्रकारे हा राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय आहे. अंतर्गत गुण रद्द करणे हा मुलांच्या भवितव्याशी खेळणारा निर्णय असल्याची प्रतिक्रीया पालकांमधून उमटली.  

सरकारी पातळीवर प्रयत्न

पालकांच्या या तीव्र प्रतिक्रियेनंतर जाग आलेल्या सरकारने आता अकरावी प्रवेश प्रक्रियेत राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश सहजसोपा व्हावा म्हणून सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचे केवळ लेखी परीक्षेचे गुण ग्राह्य धरण्याचा विचार सुरू केला आहे. यासंदर्भात केंद्रीय मंडळाशी सल्लामसलत करणार असल्याची माहितीही तावडे यांनी दिली. परंतु सीबीएसईचे विद्यार्थीही महाराष्ट्रातीलच असल्याने त्यांच्यावर होणारा हा अन्याय नसेल का असा प्रश्नही उपस्थित होत आहे.   हेही वाचा -

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे अडचणीत, सरकारी जमीन हडपल्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार

'बिग बॉस'ची शाळा सुटली, पाटी फुटलीसंबंधित विषय