Advertisement

महापालिकेची पहिली सीबीएसई शाळा, अॅडमीशनसाठी लागल्या रांगा

मुंबई महापालिकेच्या सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळेत प्रवेशासाठी पालकांच्या मोठ्या रांगा लागत आहेत.

महापालिकेची पहिली सीबीएसई शाळा, अॅडमीशनसाठी लागल्या रांगा
SHARES

मुंबई महापालिकेनं दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई आणि आयसीएसई शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, मुंबई महापालिकेतर्फे सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळा सुरू होणार आहेत. तसंच, सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या मुंबई पब्लिक स्कूलची प्रवेशप्रक्रिया २७ फेब्रुवारीपासून सुरू झाली असून, प्रवेशप्रक्रिया १५ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. या शाळांसाठी आता पर्यंत तब्बल ८५० अर्ज प्राप्त झाले आहे.

खासगी शाळांच्या तुलनेत दरवर्षी महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश कमी होतात. मात्र, आता महापालिका शाळेत प्रवेश घेण्यासाठी सध्या मोठी रांग लागल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. मुंबई महापालिका जोगेश्‍वरी (पूर्व) येथे सीबीएसई आणि माहीम येथे आयसीएसई शाळा सुरू करणार आहे. या शाळांसाठी ६ दिवसांत सुमारे ८५० अर्ज प्राप्त झाले आहे. यामध्ये सर्वाधिक पसंती सीबीएसई शाळेला मिळाली असून तेथे ७१९, तर आयसीएसई शाळेसाठी आतापर्यंत केवळ १२९ अर्ज प्राप्त झाले आहेत.

सीबीएसईची बोर्डाची शाळा पालिकेच्या अंधेरी पूर्वेकडील पूनम नगर मनपा शाळेत; तर आयसीएसई बोर्डाची शाळा माटुंगा पश्‍चिमेकडील वूलन मिल मनपा शाळेमध्ये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही बोर्डाच्या शाळा सध्या प्रायोगिक तत्त्वावर चालवण्यात येणार आहेत. त्यानुसार दोन्ही शाळांमध्ये ज्युनिअर, सिनिअर केजी पहिली ते सहावीचे वर्ग २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात सुरू करण्यात येणार आहेत.

प्रवेशासाठी पालकांना १२ मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे. आठवडाभरात सीबीएसई शाळेतील ज्युनिअर ते सहावीपर्यंतच्या प्रवेशासाठी ७१९ अर्ज आले आहेत. पालकांना ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीनं अर्ज करता येत आहे. जोगेश्‍वरी येथील सीबीएसईच्या शाळेत ऑफलाइन अर्ज भरण्यासाठी पालक दररोज रांगा लावत आहेत. त्यामुळं अर्ज भरण्याच्या मुदतीपर्यंत या शाळेसाठी हजारो अर्ज येऊ शकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आयसीएसई शाळेसाठी १२९ अर्ज आले असून, पालकांना http://bit.do/Mybmc-ICSE-CBSE या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. तसंच, ऑनलाइन प्रवेशअर्ज शाळांमध्ये उपलब्ध होणार आहेत. अर्जांची प्राथमिक छाननी व पालकांशी संवाद १३ ते २४ मार्च या कालावधीत करण्यात येणार आहे.

या प्रवेशाची पहिली यादी संकेतस्थळावर २४ मार्च रोजी जाहीर होणार आहे. तसंच, २६ ते २८ मार्च या कालावधीत प्रवेश निश्‍चित करण्यात येणार आहेत. चालू शैक्षणिक वर्षासाठी दुसरीपर्यंतचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. तर इयत्ता तिसरी ते सहावीच्या वर्गात किमान १० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यास तिसरी ते सहावीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. ज्या इयत्तेत प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची संख्या ४०पेक्षा अधिक असेल तर प्रवेशप्रक्रिया सोडतीद्वारे राबविण्यात येणार आहे.



हेही वाचा -

कोरोना व्हायरसचा खाद्यतेलाला फटका, तेलाचे दर कोसळले

ओला, सुकानंतर आता घातक कचराही वेगळं करणं बंधनकारक



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा