Advertisement

अनलिमिटेड नेट पॅकसाठी विद्यार्थ्यांना नवी मुंबई पालिकेकडून १ हजार रूपये

ज्या मुलांच्या पालकांकडे मोबाईल नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी नवी मुंबई महापालिका प्रयत्न करत आहे.

अनलिमिटेड नेट पॅकसाठी विद्यार्थ्यांना नवी मुंबई पालिकेकडून १ हजार रूपये
SHARES

आगामी शैक्षणिक वर्षात किमान पहिल्या सहामाहीत शाळा (school) भरण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे विद्यमान ऑनलाईन शिक्षण (online education) पध्दत सुरू राहील हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याकडं नवी मुंबई महापालिकेकडून (Navi Mumbai Municipal corporation) कटाक्षाने लक्ष दिलं जात आहे.

मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता नवी मुंबई महानगरपालिका शाळांमधील अधिकाधिक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण उपलब्ध होण्याकरिता पुढाकार घेऊन नाविन्यपूर्ण गोष्टी केल्या जात आहेत. यामध्ये निदर्शनास आलेली एक महत्वाची बाब म्हणजे काही पालकांना आपल्या मुलांना ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून देण्याकरिता मोबाइलमध्ये आवश्यक असलेला नेटचा अनलिमिटेड डाटा पॅक (Unlimited Net Pack) टाकणे आर्थिक स्थितीमुळे शक्य होत नाही. त्यामुळे पालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणात अडचण येऊ नये यासाठी सन २०२१ - २२ या शैक्षणिक वर्षातील पहिल्या सहामाहीसाठी नेटच्या अनलिमिटेड डाटा पॅकसाठी १००० रूपये विद्यार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे ज्या मुलांच्या पालकांकडे मोबाईल नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी  प्रयत्नही करण्यात येत आहे.  

यावर्षीही विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासोबतच कृती पुस्तिकाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सदर कृतीपुस्तिकांचे विद्यार्थ्यांना वितरण करण्यात येईल. दर १५ दिवसांनी संबंधित शिक्षक त्या विद्यार्थ्यांच्या घरी भेट देऊन त्याने अभ्यास केलेली कृतीपुस्तिका त्याच्याकडून घेतील व पुढील अभ्यासाची कृतीपुस्तिका त्याला उपलब्ध करून देतील. यामुळे त्या विद्यार्थ्याच्या अभ्यासाचे मूल्यमापनही करता येणे शक्य होईल.

याशिवाय ऑनलाईन वर्गात काही विद्यार्थ्याकडून मोठ्याने पाठ वाचन करून घेणे, जेणकरून योग्य वाचनाची व उच्चारांची सवय होईल आणि समुहात वाचनामुळे व्यक्तिमत्व विकास होईल. त्याचप्रमाणे विविधांगी उपक्रमशील शिक्षण पध्दती राबविणे अशा नाविन्यपूर्ण संकल्पना साकारण्यात येणार असून यामधून आनंददायी व सर्वांगीण विकास करणारे गुणवत्तापूर्ण शिक्षण ही उद्दिष्ट्ये  साध्य करण्यावर भर दिला जाणार आहे. ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेत उत्तम काम करणा-या स्वयंसेवी संस्थांचेही सहकार्य यामध्ये घेतले जाणार आहे.

विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाला नेट डेटा पॅकची रक्कम देऊन आर्थिक आधार देणा-या नवी मुंबई महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे ३५ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांच्या पालकांना दिलासा मिळणार आहे.



हेही वाचा - 

इन्स्टाग्रामची मैत्री नडली, अल्पवयीन मुलीवर तीन ठिकाणी सामूहिक बलात्कार

लोकलमध्ये विनामास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये मोठी घट

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा