Advertisement

आरटीई प्रवेशास ९ जुलैपर्यंत मुदतवाढ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरटीई प्रवेशांतर्गत बालकांचे प्रवेश घेण्यात पालकांना अनेक अडचणी येत आहेत. अनेक पालक हे मूळ गावी असल्याने त्यांना शाळेत जाऊन प्रवेश घेता येत नाही.

आरटीई प्रवेशास ९ जुलैपर्यंत मुदतवाढ
SHARES

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार २०२१-२२ या चालू शैक्षणिक वर्षामध्ये आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी निवड यादीतील बालकांचे प्रवेश घेण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत होती. मात्र, आता प्रवेश घेण्यासाठी ९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

ओटीपीच्या तांत्रिक कारणांमुळे प्रवेश निश्चित करण्यात अडचणी येत आहेत. ही बाब लक्षात घेऊन शिक्षण संचालनालयाने प्रवेशासाठीची मुदत वाढवली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरटीई प्रवेशांतर्गत बालकांचे प्रवेश घेण्यात पालकांना अनेक अडचणी येत आहेत. अनेक पालक हे मूळ गावी असल्याने त्यांना शाळेत जाऊन प्रवेश घेता येत नाही. त्यामुळे पहिल्या यादीतील बालकांच्या प्रवेशासाठी पालकांना ऑनलाईन प्रवेश निश्चित करण्याची मुभा दिली आहे. त्यानंतर पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश घेण्याची मुदत ३० जून देण्यात आली होती.

मात्र, गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना मिळणाऱ्या ओटीपी मेसेजमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे ऑनलाईन प्रवेश निश्चित करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे यादीतील बालकांना प्रवेश घेण्यासाठी आणि गटशिक्षणाधिकारी यांना ऑनलाईन प्रवेश निश्चित करण्यासाठी ९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण संचालनालयातर्फे घेण्यात आला आहे.

तसेच अद्यापही ज्या पालकांना प्रवेशासाठी शाळांमध्ये जाणे शक्य झाले नाही किंवा ज्या पालकांना अजूनही लॉटरी लागल्याचे कळले नाही. त्यांना एसएमएस करून शाळेत प्रवेश घेण्यासंदर्भात कळवण्यात यावेत असे आदेश शिक्षण संचालनालयाचे संचालक द.गो. जगताप यांनी राज्यातील जिल्हा परिषद आणि सर्व महापालिका प्रशासन आणि शिक्षणाधिकार्‍यांना दिले आहेत. 

आरटीईअंतर्गत राज्यात यंदा ९ हजार ४३२ शाळांमध्ये ९६ हजार ६८४ जागा उपलब्ध आहेत. शिक्षण विभागाने मार्चमध्ये जाहीर केलेल्या सोडतीमध्ये ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाले. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यावर शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रिया सुरू करून ११ ते ३० जून दरम्यान प्रवेश प्रक्रिया राबवण्याचे निर्देश दिले होते. मात्र या मुदतीत ३६ हजार ४४५ विद्यार्थ्यांना तात्पुरते प्रवेश देण्यात आले आहेत. तर २३ हजार २०५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.



हेही वाचा -

दिलासादायक! घरोघरी लसीकरणाला लवकरच सुरुवात होणार

माहुलमध्ये उभारण्यात येणार ऑक्सिजन बॉटलिंग प्लांट

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा