शाळेतूनच वह्या घेण्याची विवेकानंद शाळेची सक्ती

  Navi Mumbai
  शाळेतूनच वह्या घेण्याची विवेकानंद शाळेची सक्ती
  मुंबई  -  

  कुठल्याही शाळेला शालेय साहित्य शाळेतूनच विकत घेण्याची सक्ती विद्यार्थ्यांना करता येणार नाही. तसे केल्यास कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी सक्त ताकीद खुद्द शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी देऊनही शाळांकडून होणारी पालकांची लूट थांबलेली नाही. सानपाड्यातील विवेकानंद संकुल शाळेने आपला मनमानीपणा कायम ठेवला असून विद्यार्थ्यांना शाळेतूनच शिक्षण साहित्य खरेदी करण्याची सक्ती केली आहे. यामुळे पुन्हा एकदा या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेची मनमर्जी सहन करावी लागणार आहे.

  विवेकानंद संकुल शाळेने 5 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य शाळेतूनच विकत घेण्याची सक्ती केली आहे. कुठल्याही पालकाने बाहेरुन शिक्षण साहित्य विकत घेऊ नये म्हणून शाळेने 5 वीच्या गुणपत्रिकेवरच 'शाळेतूनच वह्या घेणे अनिवार्य आहे' असे स्पष्ट नमूद केले आहे. तसेच शाळेच्या फीमध्ये वह्यांचे मूल्यही जोडण्यात आले आहे. यासंदर्भात पालकांनी शाळेकडे विचारणा केली असता, फी कमी करता येणार नाही, अशी आडमुठी भूमिका शाळा व्यवस्थापनाने घेतली.

  शाळांकडून मनमानी पद्धतीने होणारी शुल्कवाढ तसेच शालेय साहित्य शाळेतूनच विकत घेण्याच्या सक्तीविरोधात पालकांनी शिक्षण विभागाला अनेकदा पत्रं दिली, एकत्र येऊन तक्रारीही केल्या. एवढेच नव्हे, तर पालकांनी याविरोधात 21 एप्रिल रोजी आझाद मैदानात आंदोलनही केले होते.या आंदोलनाची दखल घेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी फी व्यतीरिक्त कुठल्याही शाळेला शिक्षण साहित्य विकत घेण्याची सक्ती पालकांना करता येणार नाही, असे स्पष्ट केले.

  मात्र शिक्षणमंत्र्यांनी दिलेल्या ताकिदीचा शाळांना विसर पडलेला दिसत आहे. शिवाय अशा शाळांवर शिक्षण विभागाने अद्याप कारवाई केल्याचेही ऐकिवात नाही. शिक्षण विभाग पालकांच्या तक्रारींकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्यानेच शिक्षण आणि क्रीडा साहित्य वाजवी दरांपेक्षा जास्त किंमत आकारून विकत घेण्याची सक्ती पालकांवर होत असल्याचे विवेकानंद संकुल शाळेच्या मनमानी कारभारावरून दिसून येत आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.